
>> रश्मी पाटकर
हिंदुस्थानची माजी मिस युनिव्हर्स आणि अभिनेत्री सुश्मिता सेन ही सध्या तिच्या ताली या वेबसिरीजमुळे चांगलीच चर्चेत आहे. तृतीयपंथीयांच्या हक्कासाठी कायदेशीर लढाई लढणाऱ्या श्रीगौरी सावंत यांच्या आयुष्यावरील या वेबसिरीजमुळे तिला प्रेक्षकांकडून पसंतीची पावती मिळत आहे. दरम्यान, या वेबसिरीजचे अनुभव तिने सामना ऑनलाईनशी बोलताना सांगितले. मराठी कलाकारांसोबत काम करणं अजिबात सोपं नाही, असं सुश्मिताने आवर्जून सांगितलं.
ताली या वेबसिरीजमध्ये सुश्मिता सेनसोबत अनेक मराठी कलाकारांनी काम केलं आहे. सुश्मिता या अनुभवाविषयी बोलताना म्हणाली की, मराठी कलाकारांसोबत काम करणं हा एक वेगळा अनुभव असतो. ते सगळे कलाकार हे अत्यंत कसलेले कलाकार आहेत. एखाद्या नाटकासाठी तालीम करावी तसा ते भूमिकेचा अभ्यास करतात. आपल्या व्यक्तिरेखेच्या अंतरंगात शिरण्याचं कसब त्यांच्याकडे असतं. त्यामुळे त्यांच्यासोबत काम करताना खूप मजाही येते आणि दडपणही जाणवतं. त्यांच्यासोबत काम करणं सोपं नाही, असं सुश्मिता यावेळी म्हणाली.
गौरी सावंत यांच्याप्रमाणेच स्वीकारलेलं एकल पालकत्व आणि प्रदीर्घ न्यायालयीन लढाई यांतील साधर्म्याविषयीही ती भरभरून बोलली. ती म्हणाली की, फक्त याच गोष्टी नव्हेत तर अनेक गोष्टींमध्ये आमच्यात साम्य आहे. आम्ही दोघीही प्रचंड हट्टी आहोत. एखादं ध्येय गाठायचं ठरवलं की गाठूनच स्वस्थ बसतो. पण, अर्थात गौरी यांचा संघर्ष माझ्यापेक्षा खूप मोठा आहे. तृतीयपंथीयांना अस्तित्व मिळवून देण्याची लढाई ही खूप मोठी आणि निर्णायक आहे, असं सुश्मिता म्हणाली.
मराठी भाषा शिकण्यासाठी केलेले प्रयत्नही तिने मिश्किल पद्धतीने सांगितले. रवी जाधव यांनी आपल्याला मराठीत ज या अक्षराचे केले जाणारे वेगवेगळे उच्चार शिकवले. मराठीत बोलण्यासाठी मी मराठी शिव्याही शिकले, असा गंमतीशीर खुलासाही सुश्मिताने यावेळी केला.

























































