‘हिंदू दहशतवाद’ एक भाकड कथाच, मी निर्दोष : स्वामी असीमानंद

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

समझोता एक्सप्रेस बॉम्बस्फोट प्रकरणी मी निर्दोष आहे ही बाब आता न्यायालयानेही मान्य केली आहे. यासोबतच हिंदू दहशतवादाच्या सिद्धांतात काही अर्थ नसून ती निव्वळ एक भाकड कथा आहे हे सिद्ध झालं आहे असा दावा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक स्वामी असीमानंद यांनी केला आहे.

एका हिंदी दैनिकाला दिलेल्या मुलाखतीत स्वामी असिमानंद यांनी समझोता ब्लास्ट प्रकरणी त्यांच्यावर होणाऱ्या सर्व आरोपांचे खंडन केले. राजकीय स्वार्थासाठी हिंदू दहशतवादाची कथा तत्कालीन काँग्रेसी सरकारने रचल्याचे त्यांनी सांगितलं. समझोता ब्लास्ट प्रकरणी मी आरोपी असल्याचं मला टीव्हीवर पाहून कळलं. या प्रकरणात गोवून मला हिंदू दहशतवादाचं प्रतीक केले गेलं. माझा, साध्वी प्रज्ञा यांचा, आम्हा सर्वांचाच पोलिसांनी प्रचंड छळ करून आम्हाला गुन्हे कबूल करायला भाग पाडलं. आता मात्र न्यायालयानेच माझी निर्दोष मुक्तता केली आहे. माझ्या सुटकेमुळे “हिंदू दहशतवादी” ही निव्वळ भाकड कथा असल्याचं सिद्ध झाले आहे,असे असिमानंद म्हणाले.

राजकारणात प्रवेश करणार नाही
आपण राजकारणात प्रवेश करणार नसून सामाजिक कामांमध्येच उर्वरित आयुष्य वाहून घेणार असल्याची माहिती असिमानंद दिली. तर साध्वी प्रज्ञांची प्रतिमा बदलण्यासाठी, त्यांचा छळ करणाऱ्यांना चोख प्रत्युत्तर देण्यासाठी त्या निवडणूक लढवत आहेत असा दावा त्यांनी केला.