
सामना ऑनलाईन । भोपाळ
‘साध्वी प्रज्ञा ठाकूर महिषासूरमर्दिनी असल्याचा भासवत आहेत, हेमंत करकरे यांना आपण शाप दिल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचा दावा प्रज्ञा ठाकूर यांनी केला आहे. आता त्यांनी दिग्विजय सिंह यानांही शाप द्यावा. म्हणजे ते उमेदवारी अर्जही भरू शकणार नाही. त्यामुळे विषयच संपेल, निवडणुकीची गरजच नाही’, अशा शब्दांत शंकराचार्य स्वरुपानंद स्वरस्वती यांनी साध्वी प्रज्ञा सिंह यांच्या वक्तव्याचा निषेध केला आहे. लोकशाहीत ‘महिषासूर’ साऱखे शब्द वापारणे योग्य नाही. साध्वी प्रज्ञा ठाकूर यांनी बोलताना मर्यादा पाळावी, असा सल्लाही स्वामी स्वरुपानंद यांनी दिला.
स्वरूपानंद सरस्वती यांचे आशीर्वाद घेण्यासाठी दिग्विजय सिंह यांनी त्यांची भेट घेतली. स्वच्छ मनाने, निर्मळ हृदयाने आणि भक्तीभावाने राहणाऱ्या व्यक्तीच्या इच्छा पूर्ण होतात, असेही स्वामी स्वरुपानंद यांनी सांगितले. हिंदुस्थानातून गोमांस निर्यात कधी बंद होणार, नोटाबंदीमुळे झालेले नुकसान कसे भरून काढणार, शेतकऱ्यांच्या वाढत्या आत्महत्येची समस्या कशी सोडवणार, नर्मदा-गंगा या नद्यांची स्वच्छता कधी होणार असे त्यांनी विचारले. निवडणुकीदरम्यान प्रचारासाठी हे महत्त्वाचे मुद्दे असायला हवेत. मात्र, काही व्यक्ती मर्यादा सोडून वक्तव्ये करतात आणि मूळ समस्यांपासून जनतेचे लक्ष विचलित करतात असेही स्वरुपानंद यांनी सांगितले.

























































