माणुसकीला काळिमा! 61 वर्षांच्या वृद्ध नराधमाचे क्रौर्य, पत्नीला 120 पुरुषांसोबत ठेवायला सांगितले संबंध

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पैशांचा मोह माणसांना कोणत्या थराला घेऊन जाईल याचा काहीच नेम नसतो. याचा प्रत्यय स्वीडनमध्ये आला असून तेथे एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. तेथे एका 61 वर्षीय व्यक्तीने आपल्या पत्नीला तब्बल 120 हून अधिक पुरुषांसोबत शारीरिक संबंध ठेवण्यास भाग पाडल्याचा आरोप आहे. स्वीडनमधील क्रामफोर्स येथील एका निर्जन फार्महाऊसचा वापर करून या व्यक्तीने हे भयानक कृत्य केले. ऑनलाईन माध्यमातून पुरुषांशी संपर्क साधून तो त्यांच्याकडून पैसे घेत असे आणि पत्नीवर पाळत ठेवण्यासाठी त्याने घरात सीसीटीव्ही कॅमेरेही लावले होते.या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

आज तकने दिलेल्या वृत्तानुसार, आरोपीने पत्नीवर नियंत्रण मिळवण्यासाठी तिला ड्रग्ज दिले होते. इतकेच नाही तर, विरोध केल्यास तिला जिवंत जाळण्याची किंवा तिची बोटे कापण्याची धमकी दिली होती. 2022 पासून ऑक्टोबर 2025 पर्यंत हा छळ सुरू होता. पीडितेने हिंमत दाखवून पोलिसांत तक्रार केल्यानंतर हे सर्व प्रकरण उघडकीस आले .

या प्रकरणात आतापर्यंत 120 पुरुषांची ओळख पटली असून, त्यापैकी 28 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घरात लावलेल्या कॅमेऱ्यांमध्ये या संबंधांचे व्हिडिओ रेकॉर्ड झाले असून, हे व्हिडिओ न्यायालयात पुरावा म्हणून सादर केले जाणार आहेत. या घटनेची तुलना फ्रान्समधील गाजलेल्या ‘डोमिनिक पेलिको’ प्रकरणाशी केली जात आहे. फ्रान्समध्येही एका व्यक्तीने त्याच्या पत्नीला ड्रग्ज देऊन शेकडो परपुरुषांना तिच्यावर अत्याचार करण्यास भाग पाडले होते.

हर्नोसँड येथील न्यायालयात या खटल्याची सुनावणी सुरू आहे. दरम्यान आरोपीने सर्व आरोप फेटाळून लावले असून, हे सर्व संमतीने घडल्याचा दावा केला आहे. मात्र,पीडितेने सादर केलेले पुरावे आणि तिची साक्ष या आरोपीचा क्रूर चेहरा समोर आणत आहेत. या आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चेत असलेल्या प्रकरणामुळे स्वीडनमध्ये संतापाची लाट उसळली आहे.