
सोशल मीडियावर एका कंटेंट क्रिएटरचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. स्विगी आणि झोमॅटोवर ऑर्डर केल्यानंतर कशा प्रकारे घोटाळा सुरू, हे तिने या व्हिडिओतून स्पष्ट केले आहे. या घोटाळ्यातून डिलिव्हरी बॉय रेस्टॉरंट्सचे नुकसान करत आहेत आणि ग्राहकांची दिशाभूल करत आहेत, असे सांगितले.
कंटेंट क्रिएटरने तिच्यासोबत घडलेली घटना सर्वांसोबत शेअर करत हे प्रकरण लोकांपर्यंत पोहोचवले आहे. ‘मी स्वतःसाठी पिझ्झा ऑर्डर केला होता आणि 15–20 मिनिटांनी मला फोन आला की डिलिव्हरी बॉयचा अपघात झाला आहे. त्यामुळे रेस्टॉरंट थेट ऑर्डर डिलिव्हर करेल. यानंतर मी स्वतः रेस्टॉरंटशी संपर्क साधला, जिथे मला उत्तर मिळाले की आम्ही थेट डिलिव्हरी करत नाही. हे ऐकल्यानंतर मला थोडा संशय आला. यानंतर मी स्विगी कस्टमर केअरशी संपर्क साधला. त्यावर उत्तर मिळाले की, ऑर्डर पूर्ण होणार नाही, म्हणून तुमचे संपूर्ण पैसे परत केले जातील. मला पैसे लगेच परत केले गेले. यामुळे आता ऑर्डर येणार नाही, असे मला वाटले. पण काही वेळाने जे घडले ते धक्कादायक होते’, असे तिने सांगितले.
View this post on Instagram
तिला एका डिलिव्हरी एजंट कॉल आला. तो डिलिव्हरी एजंट तिच्या घराबाहेर पिझ्झा हातात घेऊन उभा होता. तो म्हणाला, तुम्हाला तुम्ही ऑर्डर केलेल्याची रक्कम परत मिळाली असेल. मात्र, मी तुमची ऑर्डर घेऊन आलो आहे. या QR कोडवर तुम्ही थेट पेमेंट करू शकता, असे डिलिव्हरी एजंटने तिला सांगितले. सुदैवाने तिने लगेच रेस्टॉरंटला फोन केला. मॅनेजरने स्पष्टपणे सांगितले की पैसे देऊ नका, पिझ्झा घ्या, पण पैसे देऊ नका. मग तिला संपूर्ण प्रकरण समजले.
कसा सुरू आहे घोटाळा?
स्विगी आणि झोमॅटो प्लॅटफॉर्मद्वारे ग्राहकाकडून ऑर्डर घेतली जाते. नंतर खोटे बोलून ती रद्द केली जाते आणि पैसे परत केले जातात. यानंतर, डिलिव्हरी एजंट थेट जाऊन ऑर्डर पोहोचवतो आणि ग्राहकाकडून थेट पैसे वसूल करण्याचा प्रयत्न करतो. प्लॅटफॉर्मच्या रेकॉर्डमध्ये हे पेमेंट नोंदवले जात नाही आणि रेस्टॉरंटला योग्य माहिती मिळत नाही. परिणामी, हे सर्व पैसे घोटाळा करणाऱ्याच्या खिशात जातात.