स्वतःला फिट ठेवणे हेच लक्ष्य

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> वीरधवल खाडे, जलतरणपटू

सध्या आमचे जलतरण तलाव बंद आहेत. शासनाचे निर्णय आरोग्याच्या दृष्टीने योग्यच आहेत. पण आम्ही जलतरणपटूंनी स्वतःच्या फिटनेसवर लक्ष केंद्रित करणे महत्त्वाचे आहे.

लॉकडाऊनमध्ये मी डाएटकडे पूर्ण लक्ष दिले. जलतरणपटू असल्यामुळे जास्त वजन वाढू न देणे हे माझ्यासाठी महत्त्वाचे होते. त्यादृष्टीने गेले चारपाच महिने योग्य डाएट आणि घरच्या घरी व्यायाम करून स्वतःला फिट ठेवतोय. रोगप्रतिकारशक्तीसाठी व्हिटॅमिन-सी घेतो.

सध्या जलतरण बंद आहे हे फार दुर्दैवी आहे. देशाबाहेर 70 ते 80 टक्के देशांमध्ये जलतरण, सगळे खेळ सुरू झाले आहेत. पुढच्या वर्षी ऑलिंपिक आहेत. त्याचा सगळ्यात मोठा फटका आपल्या देशाला आणि ज्या देशांमध्ये जलतरण सुरू झालेले नाही त्यांना बसणार आहे. इतर देश जलतरण सुरू करून अगोदरच ऑलिंपिकच्या तयारीत खूप पुढे निघून गेले आहेत, पण आपण अजूनही जलतरणात प्रवेश करू शकत नाही. सहा महिने सराव नाही आणि त्यानंतर सात महिन्यांनी ऑलिंपिक आहे, ही फार दुर्दैवी परिस्थिती आहे. माझ्यासारख्यांची, ज्यांची ऑलिंपिकला जायची इच्छा आहे, त्यांची आणि इतर राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय खेळाडू यांचीही तीच अवस्था आहे. एखादा चांगला खेळाडू असेल, पण त्याने जलतरणाकडे सहा महिने लक्ष दिले नाही, भविष्यात त्याला जलतरणासाठी ऑलिंपिकमध्ये सहभागी होण्याची इच्छा आहे, पण कोरोनामुळे त्याला ही इच्छा सोडावी लागतेय ही वाईट गोष्ट आहे. त्यामुळे आपल्या महाराष्ट्र सरकारने त्याबाबत योग्य निर्णय घ्यायला हवा असे मला वाटते. सक्तीची सुट्टी अशी कधीच मिळाली नव्हती. त्यामुळे या सुट्टीचा आनंदही घेता आला, कुटुंबासोबत वेळ घालवता आला, जो अन्य दिवशी इच्छा असूनही देता येत नाही. त्याचबरोबर मी ऑनलाइन कोचिंगचे तीन कोर्स केले. जलतरण बंद झाल्यावर मी कोचिंगकडे वळणार आहे. त्या दिशेने मी आणि माझ्या बायकोने प्रयत्न सुरू केले आहेत. यासंदर्भात मी लॉकडाऊन काळात खूप वाचन केले. त्यामुळे निवृत्तीनंतर प्रशिक्षक म्हणून किंवा स्वतःची अकादमी सुरू करण्याचा विचार आहे. लॉकडाऊनच्या निमित्ताने भविष्याबाबत प्रयत्न करता आला. जलतरणात व्यस्त असल्यामुळे त्याकडे वेळ देता येत नव्हता, पण त्यानिमित्ताने तो वेळ देता आला. या मिळालेल्या वेळेची संधी साधून घेतली. त्यामुळे शारीरिकदृष्टय़ा जलतरण बंद असले तरी घरच्या घरी वेगवेगळ्या गोष्टींचा अभ्यास करता आला. कोच कसा वर्कआऊट प्लॅन करतो, एका स्विमरमधून आऊटपुट कसे निर्माण करू शकतो याबाबत सगळी माहिती घेता आली. एक समुदाय मिळून आपण स्वच्छतेला कधीच प्राधान्य दिले नव्हत, तर कोरोनामुळे वैयक्तिक स्वच्छता त्याचबरोबर समुदाय स्वच्छतेत खूपच सुधारणा झाली. घरी वरचेवर हात धुणे, बाहेर पडताना मास्क वापरणे, बाहेर असताना वारंवार हातांना सॅनिटाईझ करणे ही सवय मी लावून घेतली. एवढेच नाही तर दुधाची पिशवी स्वच्छ धुऊन घेणे, भाज्या चार-पाच पाण्यातून काढणे, मासे-मटन चांगले शिजवणे याकडे बारकाईने लक्ष दिले जाते. हे सगळं कोरोनामुळे करता आलं आणि मला वाटतं, कोरोनानंतरही ही स्वच्छता अशीच राहील. या स्वच्छतेची आपल्याला चांगली सवय झालेली आहे. त्यामुळे देशाच्या आरोग्यात नक्कीच चांगली सुधारणा पाहायला मिळेल. स्वच्छतेची अशीच सवय राहिली तर भविष्यात सगळ्यांनाच त्याचा फायदा होईल. घरात आई-बाबा आयुर्वेदिक काढा, औषधे घेत असतात. रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी घरच्या घरी व्यायाम करायला हवा. फक्त काढे घेऊन, आयुर्वेदिक औषध घेऊन रोगप्रतिकारशक्ती वाढणार नाही, तर त्यासोबत व्यायामही गरजेचा आहे. त्यासाठी योगा, मेडिटेशन यांसारख्या वेगवेगळ्या व्यायाम प्रकारांचा फायदा घ्यायला हवा.