चिवला बीचवर राज्यस्तरीय सागरी जलतरण स्पर्धा

33

सामना प्रतिनिधी । मालवण

महाराष्ट्र राज्य हौशी जलतरण संघटना यांच्या मान्यतेने सिंधुदुर्ग जिल्हा जलतरण संघटना व मालवण नगर परिषद यांच्या संयुक्त विद्यमानाने ‘नववी राज्यस्तरीय सागरी जलतरण स्पर्धा रविवार १६ डिसेंबर रोजी ‘चिवला बीच’ मालवण येथे आयोजित करण्यात आली आहे. स्पर्धेच्या पूर्वसंध्येला शनिवार १५ डिसेंबर रोजी चिवला बीच येथे राष्ट्रीय ‘बीच गेम २०१८’ चेही आयोजन करण्यात आले आहे.

दरम्यान जलतरण स्पर्धेचा उदघाटन सोहळा शनिवार १५ डिसेंबर सायंकाळी ५ वाजता मामा वरेरकर नाट्यगृह येथे होणार आहे. यावेळी गृहराज्यमंत्री तथा सिंधुदुर्ग पालकमंत्री दीपक केसरकर, बंदरराज्यमंत्री रवींद्र चव्हाण, आमदार वैभव नाईक, आमदार प्रसाद लाड, नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. तर १६ रोजी सकाळी ७ वाजता मान्यवरांच्या हस्ते सागराला श्रीफळ अर्पण करून मुख्य स्पर्धेचा प्रारंभ होणार आहे. अशी माहिती सिंधुदुर्ग जिल्हा जलतरण संघटना व राज्य जलतरण संघटनेचे सेक्रेटरी राजेंद्र पालकर यांनी दिली.

मालवण नगरपरिषद नगराध्यक्ष दालन येथे संयुक्त पत्रकार परिषद संपन्न झाली. यावेळी नगराध्यक्ष महेश कांदळगावकर, डॉ. राहुल पंतवालावकर, हृदय बागवे, निल लब्दे, नगरसेवक गणेश कुशे, दीपक पाटकर, यतीन खोत उपस्थित होते.

स्पर्धेत संपूर्ण महाराष्ट्रातील २६ जिल्ह्यांतून अबाल, वृध्द, महिला, पुरुष व दिव्यांग-गतिमंद अश्या एकूण १४०० स्पर्धकांची नोंदणी पूर्ण झाली आहे. तसेच गुजरात, गोवा, बिहार, पश्चिम बंगाल, दिल्ली, तामिळनाडू, राजस्थान व कर्नाटक या आठ राज्यातून निमंत्रक स्पर्धकही सहभागी होणार आहेत. विविध १२ गटातून ६ ते ८५ वर्षे वयोगटातील प्रत्येक गटात प्रथम १० जलतरणपटूना प्रमाणपत्र, पदक, रोखरक्कम व भेटवस्तू देण्यात येणार आहे. तर स्पर्धा पूर्ण करणाऱ्या प्रत्येक स्पर्धकाला मेडल दिले जाणार आहे. ज्या जिल्ह्यातील स्पर्धक जास्त पारितोषिक मिळवतील त्या जिल्ह्यांचाही विशेष गौरव केला जाणार आहे. स्पर्धकांच्या सुरक्षेसाठी २५ जणांची विशेष बचाव टीम समुद्रात तैनात असणार आहे.

१५ रोजी सकाळी ९ वाजल्यापासून मामा वरेरकर नाट्यगृह येथे दाखल झालेल्या स्पर्धकांची नाव नोंदणी सुरू राहणार आहे. दुपारी ३ वाजता चिवला बीच येथे राष्ट्रीय बीच गेम होणार आहेत. बीच गेम पारितोषिक वितरण रात्रौ ७ वाजता मामा वरेरकर नाट्यगृह येथे होणार आहे. त्यानंतर मनोरंजन कार्यक्रमाचे आयोजन स्पर्धक व पालकांसाठी करण्यात आले आहे.

दहा हजारावा स्पर्धक सहभागी
सलग ९ वर्षे मालवण चिवला बीचवर रंगणाऱ्या या स्पर्धेला दरवर्षी वाढता प्रतिसाद मिळत आहे. यावर्षी १४०० पेक्षा जास्त स्पर्धकांची नोंदणी पूर्ण झाली आहे. यावर्षीच्या स्पर्धेचे आणखी एक महत्वाचे वैशिष्ठ म्हणजे या स्पर्धेच्या इतिहासातील १० हजारावा स्पर्धक सहभागी होऊन स्पर्धा पूर्ण करणार आहे. एखाद्या सागरी जलतरण स्पर्धेचा विचार करता हा विक्रम आहे. स्पर्धा पूर्ण करणाऱ्या त्या दहा हजराव्या स्पर्धकाचा विशेष गौरव केला जाणार आहे.

गतिमंद मुलेही समुद्रात झेपावणार
दिव्यांग व गतिमंद मुलांचा एक वेगळा गट या स्पर्धेत यावर्षी सहभागी करून घेण्यात आला आहे. आतापर्यंत सुमारे २०० दिव्यांगांची नोंदणी पूर्ण झाली आहे. दिव्यांगांचा सहभाग व त्यांच्यासाठी एक किलोमीटरची सागरी स्पर्धा हे यावर्षीच्या स्पर्धेचे वेगळे वैशिष्ठ राहणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या