स्वित्झर्लंडमध्ये बुरखा घालण्यावर बंदी; नव्या वर्षात नवा कायदा लागू कायदा मोडल्यास 96 हजारांचा दंड

स्वित्झर्लंडमध्ये महिलांनी सार्वजनिक ठिकाणी हिजाब, बुरखा किंवा कोणत्याही पद्धतीने चेहरा झाकण्यावर बंदी घालण्यात आली आहे. हा नियम नवीन वर्षाच्या 1 तारखेपासून लागू करण्यात आला आहे. या कायद्याचे उल्लंघन केल्यास एक हजार स्विस फ्रँक्स म्हणजेच जवळपास 96 हजार रुपये दंड आकारला जाणार आहे.

2021 मध्ये स्वित्झर्लंडमध्ये झालेल्या सार्वमतामध्ये 51.21 टक्के नागरिकांनी बुरख्यावर बंदी घालण्यात यावी असे म्हणत त्या बाजूने मतदान केले होते. नागरिकांच्या मागणीनंतर बुरख्यावरील बंदी घालण्याचा कायदा लागू करण्यात आला. हा कायदा 1 जानेवारी 2025 लागू करण्यात आला आहे. या कायद्याला खरं म्हणजे दोन वर्षांपूर्वी म्हणजेच 2022 मध्ये मंजुरी मिळाली होती. स्विस संसदेचे कनिष्ठ सभागृहात चेहरा झाकण्यावर बंदी घालण्याच्या कायद्यावर मतदान केले. या कालावधीत 151 सदस्यांनी बाजूने, तर 29 सदस्यांनी विरोधात मतदान केले होते. हा प्रस्ताव उजव्या विचारसरणीच्या स्विस पीपल्स पार्टीने (एसव्हीपी) मांडला होता, तर केंद्र आणि ग्रीन्स पक्ष याच्या विरोधात होते. काही लोकांच्या म्हणण्यानुसार, हा कायदा मुस्लिम महिलांसाठी अन्यायकारक आहे.