Sydney Mall Attack : मॉलमध्ये थरारक घटना; चाकूने सपासप वार, 5 जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार

ऑस्ट्रेलियाची राजधानी कॅनबेरापासून 280 किलोमीटर अंतरावर असणाऱ्या सिडनी हे शहर शनिवारी दुपारी भयानक चाकूहल्ल्याने हादरले. शहरातील वर्दळीच्या शॉपिंग मॉलमध्ये माथेफिरूने अचानक केलेल्या चाकूहल्ल्यामध्ये 5 नागरिकांचा मृत्यू झाला असून अनेक जखमी झाले आहेत. या हल्ल्यानंतर घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांनी हल्लेखोरालाही ठार केले.

सिडनीच्या वेस्टफील्ड बॉन्डी जंक्शन शॉपिंग मॉलमध्ये शनिवारी दुपारी पावणे चारच्या सुमारास माथेफिरूने चाकूहल्ला केला. ऐन गर्दीच्या वेळी हल्लेखोरांनी नागरिकांना चाकूने सपासप वार करायला सुरुवात केल्याने एकच खळबळ उडाली. नागरिकांची पळापळ सुरू झाली, दुकानदारांनी दुकानं बंद केली. यामुळे शॉपिंग मॉलमध्ये गोंधळ उडाला.

माथेफिरूच्या हल्ल्यामध्ये 5 नागरिकांचा मृत्यू झाला, तर अनेक जखमी झाले. या हल्ल्याची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि मॉलला घेराव घातला. पोलिसांनी आत अडकलेल्या नागरिकांना सुरक्षित बाहेर काढले आणि हल्लेखोराला गोळी घालून ठार केले. त्यानंतर सुरक्षेच्या कारणास्तव मॉलही बंद करण्यात आला. पोलीस दहशतवादी हल्ल्याच्या अँगलनेही याचा तपास करत आहे.

या हल्ल्याबाबत प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, एक व्यक्ती चाकू घेऊन मॉलमध्ये फिरत होता आणि दिसेल त्याच्यावर वार करत होता. पोलिसांनी गोळी घालण्यापूर्वी त्याने एका महिलेसह मॉलमधील दुकानदारांना आणि नागरिकांना भोसकले होते. यामुळे मॉलमधील फरशीवर रक्तमांसाचा चिखल साचला होता.

दरम्यान, ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बनीज यांनीही या हल्ल्याची दखल घेतली असून एक्सवर एक पोस्ट करत त्यांनी दु:ख व्यक्त केले. या हल्ल्यामध्ये मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांच्या कुटुंबियांप्रती संवेदना व्यक्त करत पोलिसांच्या धाडसाचेही अल्बनीज यांनी कौतुक केले.