
टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतील पात्रता फेरी जशी धक्कादायक निकालांनी गाजली त्याचप्रमाणे सुपर-12 फेरीचीही धक्कादायक निकालाने सुरुवात झाली आहे. सलामीच्या लढतीत गतविजेत्या ऑस्ट्रेलियाला पराभवाचा ‘किवी शॉक’ बसला. न्यूझीलंडने या यजमान संघाचा 89 धावांनी धुव्वा उडवून आम्हीदेखील जेतेपदाचे दावेदार आहोत हे क्रिकेटविश्वाला दाखवून दिले. डेवन कॉन्वे (नाबाद 92) व फिन एलन (42) यांची फटकेबाजी आणि अचूक गोलंदाजीच्या बळावर न्यूझीलंडने हा रुबाबदार विजय मिळविला. 8 धावांनी शतकापासून वंचित राहिलेला डेवॉन कॉन्वे या विजयाचा शिल्पकार ठरला.
ऑस्ट्रेलियन फलंदाजांची शरणागती
न्यूझीलंडकडून मिळालेले 201 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाचा डाव 17.1 षटकांत 111 धावांवरच गारद झाला. टिम साऊदीने डेव्हिड वॉर्नरचा (5) दुसऱयाच षटकात त्रिफळा उडविल्यानंतर ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजीला लागलेली गळती शेवटपर्यंत थांबली नाही. त्यांच्याकडून ग्लेन मॅक्सवेल (28) हा सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला. त्यानंतर पॅट कमिन्स (21), मिचेल मार्श (16), कर्णधार ऍरोन फिंच (13) व टिम डेव्हिड (11) हे दुहेरी धावा करणारे फलंदाज ठरले. टिम साऊदी व मिचेल सॅण्टनर यांनी 3-3 बळी टिपत ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजीतील हवा काढून घेतली. ट्रेंट बोल्टने 2 बळी टिपत शेपटाला गुंडाळले. लॉकी फर्ग्युसन व इश सोढी यांनी 1-1 गडी बाद केला.
4 षटकांत 56 धावांची सलामी
त्याआधी, नाणेफेकीचा कौल जिंकून न्यूझीलंडला फलंदाजी देण्याचा निर्णय ऑस्ट्रेलियाच्या चांगलाच अंगलट आला. फिन एलन (42) व डेवन कॉन्वे यांनी ऑस्ट्रेलियन गोलंदाजीवर हल्लाबोल करीत 4 षटकांत 56 धावा ठोकल्या. फिनने 16 चेंडूंत 5 चौकार व 3 षटकार मारले. जोश हेजलवूडने फिनचा त्रिफळा उडविला अन् हे वादळ शमले. मात्र, डेवनने कर्णधार केन विल्यम्सन (23), ग्लेन फिलिप्स (12) व जेम्स निशाम (नाबाद 26) यांना हाताशी धरून न्यूझीलंडला 3 बाद 200 अशी आव्हानात्मक धावसंख्या उभारून दिली. डेवॉनने 58 चेंडूंत 7 चौकार व 2 षटकारांसह आपली नाबाद खेळी सजविली.
इंग्लंडचा विजय
विश्वचषक टी-20 क्रिकेट स्पर्धेतील सुपर-12 लढतीत अफगाणिस्तानने बलाढय़ इंग्लंडला विजयासाठी झुंजविले. कमी धावसंख्येच्या या लढतीत इंग्लंडने 5 गडी आणि 11 चेंडू राखून बाजी मारली. केवळ 10 धावांत अफगाणिस्तानचा निम्मा संघ गारद करणारा सॅम करण या सामन्याचा मानकरी ठरला.
अफगाणिस्तानकडून मिळालेले 113 धावांचे लक्ष्य इंग्लंडने 15.1 षटकांत 5 फलंदाजांच्या मोबदल्यात पूर्ण केले. त्यांच्याकडून लिअम लिव्हिंगस्टोन (नाबाद 29), कर्णधार जोस बटलर (18), ऍलेक्स हॅलेस (19) व डेव्हिड मलान (18) यांनी उपयुक्त फलंदाजी केली. अफगाणिस्तानच्या गोलंदाजांनी 12 वाईड चेंडू टाकले, अन्यथा लढतीतील थरार आणखी वाढला असता. त्याआधी, नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करताना अफगाणिस्तानचा डाव 19.4 षटकांत 112 धावांवर संपुष्टात आला.

























































