
या वर्षी ऑक्टोबर-नोव्हेंबर या कालावधीत आयोजित करण्यात येणारा टी-20 वर्ल्ड कपअखेर यूएईमध्ये होणार असल्याचे सोमवारी निश्चित झाले. बीसीसीआयचे अध्यक्ष सौरभ गांगुली यांनी याबाबत माहिती दिली. टी-20 वर्ल्ड कप कोणत्या तारखेपासून सुरू होईल आणि जेतेपदाचा फैसला केव्हा होईल याबाबत निर्णय घेण्यात आलेला नाही. लवकरच वेळापत्रकाची घोषणा करण्यात येईल, असेही सौरभ गांगुली यांच्याकडून स्पष्ट करण्यात आले. टी-20 वर्ल्ड कप आयोजनाबाबत निर्णय घेण्यासाठी आयसीसीकडून बीसीसीआयला मुदत देण्यात आली होती. बीसीसीआयने शेवटी स्पर्धा मायदेशात न खेळवण्याचा निर्णय घेतला. कोरोनामुळे ही स्पर्धा हिंदुस्थानातून यूएईला हलवण्यात आलेली आहे.
17 ऑक्टोबरपासून स्पर्धेला सुरुवात होण्याची शक्यता
टी-20 वर्ल्ड कप हिंदुस्थानातून यूएईला हलवण्यात येणार असला तरी या स्पर्धेचे यजमान पद बीसीसीआयकडेच राहणार आहे. सौरभ गांगुली या वेळी म्हणाले, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर स्पर्धा हलवण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. सर्वांच्याच आरोग्याला प्राधान्य देण्यात आलेले आहे. पण स्पर्धेचे वेळापत्रक अद्याप निश्चित करण्यात आलेले नाही. लवकरच याची घोषणा करू. दरम्यान, 17 ऑक्टोबरला टी-20 वर्ल्ड कप सुरू होण्याची शक्यता या वेळी सूत्रांकडून व्यक्त करण्यात आली आहे.


























































