टी-20 विश्वचषकात प्रथमच डीआरएसचा वापर होणार, आयसीसीचा निर्णय

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) टी 20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत डीआरएसचा वापर करण्यास मंजुरी दिली आहे. या स्पर्धेच्या इतिहासात प्रथमच डीआरएसचा उपयोग केला जाणार आहे. मागची टी-20 विश्वचषक स्पर्धा 2016 मध्ये झाली तेव्हा टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यात डीआरएस प्रणाली उपलब्ध नव्हती, मात्र महिलांच्या टी 20 विश्वचषकात याचा वापर केला गेला आहे. 2018 मध्ये वेस्ट इंडीजमध्ये झालेल्या महिला टी 20 विश्वचषकात डीआरएस प्रणालीचा वापर केला गेला.

2017 पासून आयसीसीच्या सर्व मोठय़ा स्पर्धेत डीआरएसचा वापर केला जात आहे. गेल्या वर्षी जून महिन्यात आयसीसी गव्हर्निंग काwन्सिलने क्रिकेटच्या सर्व प्रकारात प्रत्येक सामन्याच्या प्रत्येक डावात प्रति संघ अतिरिक्त डीआरएस मंजूर केला आहे. टी-20 आणि एकदिवसीय सामन्यातील प्रत्येक डावात दोन रिह्यू देण्यात आले, तर कसोटीतील प्रत्येक डावात तीन रिह्यू देण्यात आले.

किमान षटकांची मर्यादा वाढवली

आयसीसीने विलंबित आणि पावसामुळे होणाऱया सामन्यांसाठी किमान षटकांची मर्यादा वाढवण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. ‘डकवर्थ-लुईस’ नियमानुसार लागणाऱया निकालासाठी दोन्ही संघांना किमान पाच षटके फलंदाजी करणे आवश्यक आहे, मात्र उपांत्य आणि अंतिम फेरीसाठी हा नियम वेगळा असेल. या दोन सामन्यांत प्रत्येक संघाला किमान 10 षटके फलंदाजी करणे आवश्यक आहे.

दोन ड्रिंक्स इंटरव्हल वाढवले

आयसीसीने जाहिरातीसाठी अधिक वेळ मिळावा या उद्देशाने टी-20 विश्वचषक स्पर्धेदरम्यान दोन ड्रिंक्स इंटरव्हल वाढविण्याचा निर्णय घेतला. प्रत्येक डावाच्या मध्याला हा ड्रिंक्स इंटरव्हल होईल. प्रत्येक ड्रिंक्स इंटरव्हल अडीच मिनिटांचा आहे. त्यामुळे या नव्या नियमामुळे लढतीदरम्यान जाहिराती दाखविण्यासाठी पाच मिनिटांचा अतिरिक्त वेळ मिळणार आहे.