T20 World Cup – हिंदुस्थान-पाकिस्तान पुन्हा भिडणार? जाणून घ्या सेमीफायनल आणि फायनलचं समीकरण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

महाशिवरात्रीच्या दिवशी म्हणजेच 15 फेर्ब्रुवारी रोजी साखळी फेरीत हिंदुस्थान आणि पाकिस्तान यांच्यामध्ये श्रीलंकेतील कोलंबोमध्ये सामना खेळला गेला. या सामन्यात टीम इंडियाने पाकिस्तानचा एकतर्फी धुव्वा उडवला. फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण तिन्ही आघाड्यांवर टीम इंडियाचा वरचष्मा राहिला. सुरुवातीला टीम इंडियाविरुद्ध खेळणार नसल्याचा पवित्रा घेतलेल्या पाकिस्तानला चोपून काढल्यामुळे पाकिस्तान पुन्हा एकदा तोंडघाशी पडला. हिंदुस्थान-पाकिस्तान सामन्याची जगभरातील क्रीडा प्रेमींना उत्सुकता असते. त्यामुळे आता पुन्हा हे दोन संघ एकमेकांना कधी भिडणार, याची चर्चा आता सुरू झाली आहे.

सूपर 8 चे वेळापत्रक जाहीर झाले असून टीम इंडिया सूपर 8 मध्ये तीन सामने खेळणार आहे. पहिला सामना 22 फेब्रुवारी रोजी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध, दुसरा सामना 26 फेब्रुवारी रोजी झिम्बाब्वेविरुद्ध आणि तिसरा सामना 1 मार्च रोजी वेस्ट इंडिजविरुद्ध खेळणार आहे. त्यामुळे सुपर 8 मध्ये हिंदुस्थान-पाकिस्तान यांच्यात लढत होणार नाही हे निश्चित आहे. परंतू सेमी फायनल आणि फायनलमध्ये हे दोन संघ एकमेकांच्या समोर येण्याची दाट शक्यता आहे.

कसं असेल सेमीफायनल आणि फायनलचं समीकरण?

हिंदुस्थान पाकिस्तान यांच्यामध्ये सेमीफायनलमध्ये लढत होण्याची शक्यता आहे. दोन्ही संघ सूपर 8 मध्ये वेगवेगळ्या ग्रुपमध्ये आहेत. त्यामुळे जर दोन्ही संघ सेमीफायनलसाठी पात्र ठरले तर दोन्ही संघांमध्ये भिडत होऊ शकते, पण कशी? जर हिंदुस्थान आपल्या ग्रुपमध्ये पहिल्या क्रमांकावर आणि पाकिस्तान त्यांच्या ग्रुपमध्ये दुसऱ्या क्रमांकावर राहिला तर, दोन्ही संघ सेमी फायनलमध्ये भिडतील.

हिंदुस्थान आणि पाकिस्तान दोन्ही संघ जर सेमीफायनलमध्ये पोहोचल्यावर जर एकमेकांना भिडले नाहीत तर समीकरण बदलू शकतं. हिंदुस्थानने सेमीफायनलमध्ये विजयश्री खेचून आणला आणि दुसरीकडे पाकिस्ताननेही सेमीफायनल जिंकली, तर दोन्ही संघांमध्ये टी20 वर्ल्ड कप उंचावण्यासाठी अंतिम लढत होईल.