T20WC रोहितचे अर्धशतक, दुसऱ्या सराव लढतीतही टीम इंडियाचा दणदणीत विजय

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

टी-20 वर्ल्डकपमधील आपले अभियान सुरू करण्यापूर्वी टीम इंडियाने दोन्ही सराव लढती जिंकून विरोधी संघांना एकप्रकारे इशारा दिला आहे. बुधवारी झालेल्या दुसऱ्या सराव लढतीत टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाचा 9 विकेट्सने दारुण पराभव केला. कर्णधार रोहित शर्मा याने अर्धशतकी खेळी करत संघाच्या विजयात मोलाचे योगदान दिले.

नियमीत कर्णधार विराट कोहली याने आजच्या लढतीत आराम करण्याचा निर्णय घेतल्याने कर्णधारपदाची धुरा रोहित शर्माकडे सोपवण्यात आली. ऑस्ट्रेलियाचा कर्णधार अॅरॉन फिंच याने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी घेतली. मात्र हा निर्णय त्याच्या चांगलाच अंगलट आला. सलामीवीर वॉर्नर, फिंच आणि त्यानंतर आलेला मिशेल मार्श हे तिघे आवघ्या 14 धावांमध्ये माघीर परतले.

यानंतर स्टीव्ह स्मिथ आणि ग्लेन मॅक्सवेल यांनी 50 धावांची भागिदारी केली. मॅक्सवेल बाद झाल्यानंतर स्मिथ आणि स्टॉयनिस या जोडीनेही 50 धावांची भागिदारी करत संघाला 150 चा टप्पा पार करून दिला. स्मिथच्या 57, मॅक्सवेलच्या 37 आणि स्टॉयनिसच्या 41 धावांच्या बळावर ऑस्ट्रेलियाने 152 धावा केल्या. टीम इंडियाकडून सर्वाधिक दोन बळी अश्विनने घेतले, तर राहुल चहर, रविंद्र जाडेजा आणि भुवनेश्वरला प्रत्येकी एक बळी मिळाला.

T20WC पांड्याने टेन्शन वाढवलं, आराम करणाऱ्या कोहलीला मैदानात उतरावं लागलं

विजयासाठी 153 धावांचे आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या टीम इंडियाला कर्णधार रोहित शर्मा आणि के.एल. राहुलने अर्धशतकीय सलामी दिली. पहिल्या सराव लढतीत अर्धशतक करणारा राहुल आज 39 धावांवर बाद झाला. मात्र रोहितने एक बाजू लावून धरत अर्धशतक ठोकले. रिटायर्ड हर्ट होण्यापूर्वी त्याने 60 धावांची खेळी केली. यानंतर सूर्यकुमार यादव आणि हार्दिक पांड्या यांनी संघाला अठाव्या षटकात विजय मिळवून दिला. सूर्यकुमारने 38 आणि पांड्याने 14 धावांचे योगदान दिले.