सूरवंदना

228

कलाकार आपल्या कलेच्या रूपाने श्रोत्यांच्या कायम स्मरणात राहतात. त्यांना त्यांच्या कलेतूनच आठवले जातात.

तबला, गिटार, पखवाज, ढोलकी, ड्रम, झांज अशा वेगवेगळय़ा वादनांचा आस्वाद मुंबईकरांना अनुभवता येणार आहे. निमित्त आहे ते तबल्याचे जादूगार उस्ताद अल्लारखा म्हणजेच ‘होमेज टू अब्बाजी’ या कार्यक्रमातून. 3 फेब्रुवारी रोजी षण्मुखानंद सभागृहात त्यांना जगभरातील कलाकार अनोख्या पद्धतीने मानवंदना देणार आहेत.

तबल्याला जागतिक स्तरावर कीर्ती मिळवून देणारे…ऑल इंडिया रेडिओवर तबला सोलोवादन करणारे पहिले कलाकार…नामांकित अनेक कलाकारांना तबल्याची उत्स्फूर्त साथ देणारे तबल्याचे जादूगार म्हणजेच उस्ताद अल्लारखा ऊर्फ अब्बाजी. उस्ताद अल्लारखा यांच्या पुण्यतिथीनिमित्त दरवर्षी ‘होमेज टू अब्बाजी’ हा कार्यक्रम सादर केला जातो. हा कार्यक्रम तीन विभागांत होणार आहे. हा कार्यक्रम सकाळी 6.30 वाजल्यापासून रात्री 10 वाजेपर्यंत सुरू राहणार आहे. यामध्ये कार्यक्रमाची सुरुवात ‘ताल प्रणाम’ने होणार आहे. यामध्ये ‘उस्ताद अल्लारखा इन्स्टिटय़ूट ऑफ म्युझिक’चे विद्यार्थी त्यांची कला सादर करणार आहेत, सुरेश वाडकर आणि आजिवनचे विद्यार्थी भक्तिगीते सादर करतील आणि पुर्बायन चॅटर्जी सतारवादन करणार आहेत. त्यानंतर सकाळी 11 वाजता ‘तालतपस्या’ हा कार्यक्रम होणार असून यामध्ये झाकीर हुसेन आणि फजल कुरेशी तबलावादन करणार आहेत, तर तौफिक कुरेशी डीजेम्बे सादर करणार आहेत. तबलावादन शुभ महाराज करणार आहेत. अखिलेश गुंडेचा यामध्ये पखवाज वादन करणार आहेत, त्रिची संकरन मृदंगम् वादन करणार आहेत. त्यानंतर सेलिब्रेट अब्बाजी’ या तिसऱया सेशनमध्ये दक्षिण हिंदुस्थानातील फोक ड्रम, ग्रॅग एलिस ढोलकीचा ताल धरणार आहेत. याचबरोबर झांज वादक लुईस बँक्स, संजय दिवेचा गिटार वादन, व्हायोलिनवादक गणेश राजगोपालन, दक्षिण हिंदुस्थानातील खंजरीवादक व्ही. सेल्वागणेश, ड्रमवादक जिनो बँक्स, शेल्डन डिसिल्वा बास गिटार, उस्ताद झाकीर हुसेन तबला वादन करणार आहेत. सलिम -सुलेमान ऍण्ड एसेंबल सादरीकरण करणार आहेत. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय कलाकारांसोबत उस्ताद झाकीर हुसेन आपली कला सादर करणार आहेत.

या कार्यक्रमाबाबत ज्येष्ठ तालवादक तौफिक कुरेशी सांगतात, आम्ही दरवर्षी म्हणजे 2001पासून अब्बाजींची पुण्यतिथी साजरी करतो. या वर्षीही त्यांची 20वी पुण्यतिथी आहे. तेव्हापासून षण्मुखानंद सभागृहात तालप्रणाम असतो. वेगवेगळे कलाकार त्यांच्या कला सादर करणार आहेत. साडेसहा वाजल्यापासून रात्री दहा वाजेपर्यंत दिवसभर संगीतमय वातावरण रसिकांना अनुभवता येणार आहे. या कार्यक्रमातील कलाकारच असे आहेत की, त्यांच्या कलेचे वेगळेपण नक्कीच आपल्याला अनुभवता येईल. संगीत कला आपल्याकडे वर्षानुवर्षे सादर होत असते आणि होत राहील, मात्र आपले कलाकार आपल्या वेगळय़ा सादरीकरणाने रसिकांना मंत्रमुग्ध करतील एवढे नक्की.

तबला-ताल-स्वरांच्या नादात
उस्ताद अल्लारखा यांचा सहवास लाभलेले कलाकार शिष्य सांगतात. ते नेहमीच तबला-ताल-स्वर यांच्या नादात असायचे आणि त्यामध्येच नवीन तिहाई निर्माण करून ऐकवायचे. जो कलाकार कायम त्याच छंदात आणि नादात असतो तोच महान कलाकार होतो. सितारादेवी, बिरजू महाराज यांना नृत्य तबला साथ, बडे गुलाम अली खां, अल्लाउद्दीन खां, विलायत खां, वसंत राय अशा अनेक कलाकारांना त्यांनी तबला साथ केली आहे. ड्रमर मिकी हार्ट, जॉर्ज हॅरिसन, बडी रिच (ड्रमर) यांच्याबरोबर सहवादन केले. ‘वेस्ट मिटस् इस्ट’ या जगप्रसिद्ध अल्बममध्ये रवी शंकर, यहुदी मेन्यूहीन (व्हायोलीन), जिन पेरे (फ्लूट) यांना साथ केली. अल्लारखा ऑल इंडिया रेडियोवर तबला सोलोवादन करणारे पहिले कलाकार होते. त्यावेळी जवळजवळ सर्व नामांकित गायक-वादकांना साथ करताना उस्ताद अल्लारखा यांनी पं. रविशंकर यांना साथ करत असताना अमेरिका दौरे केले. ‘मोंटेरी पॉप फेस्टिवल, ‘वुड स्टॉक फेस्टिवल’ (1969) अशा अनेक फेस्टिवलमध्ये हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताचा झेंडा अटकेपार लावला.

मैं तो सिर्फ तबले की भाषा जानता हूँ
‘मैं तो सिर्फ तबले की भाषा जानता हूं’ असं म्हणणाऱया उस्ताद अल्लारखा यांचे (अब्बाजी) आयुष्य लहानपणापासूनच तबलामय झालेले होते, त्यांच्या वडिलांना गाणे ऐकायची आवड होती. बाकी सगळे घराणे फौजींचे (डोगरा रेजिमेंट) होते. त्यांच्या गावी गुरुदासपूर येथे रामलीलासारखे कार्यक्रम होत. वडिलांबरोबर ते ऐकताना त्यात साथीला वाजवले जाणारे मधुरपद, धृपद, धमार हे प्रकार ते कानांनी टिपून घेत आणि घरी जाऊन भांडय़ावर ते वाजवून बघत. असा रियाज करून त्यांना तबला वाजवता येऊ लागला. एका संगीत संमेलनात धुरपदीये येणार होते, कोणीतरी आयोजकांना इथे एक मुलगाही तबला वाजवतो असे सांगितले. अल्लारखा यांनी वाजवलेल्या शिखरताल, इंद्रतालचे खूप कौतुक झाले. त्यांच्या लहान वयाकडे बघून त्यांच्याकडून शिकायला संकोचणारे त्यांच्याकडे तबला शिकू लागले. पैसे हे त्यांचे ध्येय नव्हते; तर गुरूपर्यंत पोहचण्याचे साधन होते.

आपली प्रतिक्रिया द्या