ताडोबातील वाघांवर करडी नजर, मध्यप्रदेशातील घटनेची पुनरावृत्ती टाळण्यासाठी व्यापक उपाय; बफर क्षेत्रातील कुत्र्यांचे लसीकरण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मध्यप्रदेशात अलीकडेच झालेल्या वाघांच्या अचानक मृत्यूच्या पार्श्वभूमीवर ताडोबा व्यवस्थापनाने खबरदारीचा उपाय म्हणून बफर क्षेत्राला लागून असलेल्या भागातील कुत्र्यांचे लसीकरण सुरू केले आहे.

मध्यप्रदेशात कान्हा प्रकल्पात नुकताच एक वाघीण आणि चार पिल्लांचा अचानक मृत्यू झाला. त्यामुळे मोठी खळबळ उडाली होती. त्यानंतर केलेल्या तपासात हा मृत्यू केनाइन डिस्टेम्पर व्हायरसमुळे झाले (Canine Distemper Virus) असल्याचे निष्पन्न झाले. हा व्हायरस प्रामुख्याने कुत्र्याकडून किंवा लांडगा, कोल्हा यासारख्या प्राण्यांकडून होतो. ताडोबातील वाघांना या व्हायरसची बाधा होऊ नये, यासाठी विशेष पथके वाघांवर करडी नजर ठेवून आहेत.

व्हायरसची भीती लक्षात घेता ताडोबा व्यवस्थापनाने बफर क्षेत्रालगत असलेल्या 95 गावातील अडीच हजार कुत्रे शोधले असून, त्यांना रोगप्रतिबंधक लस दिली जात आहे. हे काम युद्धपातळीवर सुरू असून आतापर्यंत नव्वद टक्के गावातील कुत्र्यांना लस देण्यात आली आहे. याशिवाय संशयास्पद कुत्र्यांच्या मुखातील स्राव गोळा केला जात असून, तो तपासणीसाठी प्रयोगशाळेकडे पाठवला जात आहे. ताडोबा व्यवस्थापनाने विशेष पथकेही स्थापन केली असून, याद्वारे जंगलातील प्रत्येक भागात वास्तव्य करणाऱ्या तृणभक्षी आणि रानकुत्र्यांवर बारीक लक्ष ठेवले जात आहे. गावकऱ्यांनी सचेत रहावे, यासाठी जागृती केली जात असून, प्रत्येक कुत्र्याच्या हालचालींची माहिती देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

भटकी कुत्री हे केवळ वन्यजीवांसाठीच नव्हे तर मानवी आरोग्यासाठीही चिंतेचा विषय आहे. कुत्र्यांच्या चावण्याच्या घटना तसेच रेबीज व इतर रोगांचा प्रसार यामुळे हा प्रश्न अधिक गंभीर बनत चालला आहे. त्यामुळे भटक्या कुत्र्यांच्या निर्बिजीकरण व लसीकरणाचा कार्यक्रम संस्थात्मक पद्धतीने राबविण्यात येत आहे, जेणेकरून भविष्यात निर्माण होणाऱ्या समस्या प्रभावीपणे रोखता येतील. याशिवाय भटक्या कुत्र्यांच्या रक्तनमुन्यांच्या सिरोटायपिंगच्या दिशेनेही काम सुरू करण्यात आले आहे. कोणताही संसर्गजन्य उद्रेक झाल्यास त्याची माहिती तात्काळ व्यवस्थापन व पशुवैद्यकीय पथकापर्यंत पोहोचावी यासाठी मार्गदर्शक तत्वे विकसित करण्यात येत आहेत. यासाठी वनरक्षक व क्षेत्रीय कर्मचाऱ्यांचे क्षमता विकास प्रशिक्षण कार्यक्रमही राबविण्यात येत आहेत, असे ताडोबाचे क्षेत्र संचालक प्रभुनाथ शुक्ला यांनी सांगितले.

  • २०२५-२६ दरम्यान एकूण २,३६५ कुत्र्यांचे लसीकरण करण्यात आले आहे. यापैकी पीपल फॉर अॅनिमल्स, वर्धा यांच्या माध्यमातून १,९४५ कुत्र्यांचे निर्बिजीकरण व लसीकरण करण्यात आले असून वाइल्ड सीईआर यांच्या माध्यमातून ४२० कुत्र्यांचे निर्बिजीकरण व लसीकरण करण्यात आले आहे.