
1 ऑक्टोबरपासून ताडोबा व्याघ्रप्रकल्प पर्यटकांसाठी सुरु करण्यात आला. मात्र, ताडोबा व्याघ्रप्रकल्पाचं सर्वात मोठं आकर्षण समजली जाणारी माया वाघीण अजूनही पर्यटकांच्या नजरेस पडलेली नाही. त्यामुळे माया वाघिणीचा माग काढण्यासाठी सध्या 125 कॅमेरा ट्रॅप लावण्यात आलेले आहे. मात्र माया वाघिणीचा अधिवास असलेल्या पांढरपौनी भागात सध्या खूप पाणी असल्याने आणि या वाघिणीचा जुना अनुभव बघता या भागात फूट पेट्रोलिंग शक्य नाही, त्यामुळे वाहनांच्या मदतीने देखील तिचा माग काढल्या जात आहे.
माया वाघीण शेवटची 25 ऑगस्टला पंचधारा या लोकेशनवर मजुरांना दिसली होती, त्यावेळी ती प्रेग्नंट असल्याचं वाटत होतं, त्यामुळे तिच्या जवळ छोटे बच्चे असल्याने ती बाहेर येत नसावी अशी एक शक्यता आहे. सोबतच मायाच्या टेरेटरीमध्ये सध्या छोटी तारा आणि रोमा या 2 वाघिणी पण दिसत आहेत. त्यामुळे मायाने आपला एरिया शिफ्ट केल्याची देखील शक्यता आहे आणि शेवटचं म्हणजे माया सध्या 13 वर्षांची आहे आणि या वयात वाघाचा नैसर्गिक मृत्यू होणे स्वाभाविक असल्याने वनविभाग यादृष्टीने पण शक्यता तपासत आहे.

























































