
कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यातील कुरुंदवाड परिसरात चार दिवसांपूर्वी झालेल्या वादळी पावसाने झेंडू फूलशेतीचे मोठे नुकसान झाले आहे. शेतामध्ये पाणी साचल्यामुळे फूलझाडे उफाळली आहेत. झेंडूची फुले फुलण्यापूर्वीच कोमेजल्याने शेतकऱयांचे नुकसान झाले आहे.
कुरुंदवाड परिसराला चार दिवसांपूर्वी वादळी पावसाने झोडपून काढले. या पावसाचा फूलशेतीला मोठा फटका बसला. शेतात जवळपास 2 फूट पाणी साचून राहिल्याने झेंडूची झाडे मुळापासूनच करपू लागली आहेत. कुरुंदवाड-नांदणी मार्गावर केदार पाटूकले यांची झेंडूची शेती आहे. दोन महिन्यांपूर्वी झाडे लावली. आता फुले येण्याचा बहर होता. मात्र, पावसाने फुले फुलण्यापूर्वीच ती कोमेजली आहेत. पाटुकले यांच्या शेतात पाणी साचून फुले सडत आहेत. वाऱयाने झाडे भुईसपाट झाली आहेत.
दरम्यान, या फूलशेतीतून आम्हाला एकरी दोन ते अडीच लाखांचे उत्पन्न मिळते. मात्र, पावसाने हे सर्व हिरावून घेतले आहे, असे पाटुकले यांनी सांगितले.



























































