‘ताजमहाल’ दोन वर्षे मौनात, ट्विटर अकाऊंट बंद, ट्रम्प यांच्या दौऱयाने केली योगी सरकारची पोलखोल

472

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या आग्रा दौऱयाने उत्तर प्रदेश सरकारमधील योगी आदित्यनाथ सरकारची ताजमहालबद्दलची उदासीनता उघड केली आहे. ट्रम्प सोमवारी आग्रा दौऱयात जगप्रसिद्ध ताजमहालला भेट देणार आहेत. त्यासाठी आग्रा आणि आजूबाजूचा परिसर आणि रस्त्यांचे सुशोभीकरण आणि सजावट युद्धपातळीवर केली जात असताना गेल्या दोन वर्षांपासून ताजमहालचे ट्विटर अकाऊंट बंद असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प दोन दिवसांच्या हिंदुस्थानच्या दौऱयावर आहेत. अहमदाबादला भेट दिल्यानंतर ट्रम्प परिवार सोमवारी आग्र्यातील जगप्रसिद्ध ताजमहालला भेट देणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर, ताजमहाल आणि आजूबाजूच्या परिसराचे सुशोभीकरण, रोषणाई, सजावट आणि रस्त्यांची डागडुजी केली जात आहे. मात्र, ताजमहालचे ट्विटर अकाऊंट 2018पासून बंद आहे. ताजमहालला जगाच्या कानाकोपऱयात नेण्याचे काम ट्विटर अकाऊंटवरून सुरू असताना योगी आदित्यनाथ सरकारच्या काळात मात्र या अकाऊंटचा वापर थांबवण्यात आला. त्यामुळे हिंदुस्थानी पर्यटनाला जागतिक पातळीवर नेण्याचे उत्तर प्रदेश सरकारचे प्रयत्न हे केवळ दिखावटी आहेत अशी टीका सर्व स्तरांतून करण्यात येत आहे. ज्यांनी मला पाहिले आणि ज्यांनी मला पाहिले नाही असे दोघेही मला फॉलो करू शकतात असे अभिमानाने सांगणारे ताजमहालचे ट्विटर अकाऊंट आता बंद आहे.

योगी सरकारची उदासीनता
उत्तर प्रदेशमध्ये योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वाखाली 2017 मध्ये भाजपने सत्ता स्थापन केली, मात्र त्यानंतर ताजमहाल आणि त्याच्या अकाऊंटकडे संपूर्ण दुर्लक्ष करण्याचे काम सुरू झाले. 2018मध्ये अनुपम पांडेय या सामाजिक कार्यकर्त्याने राज्य सरकारच्या जनसुनावणी पोर्टलवर पहिल्यांदा ताजचे ट्विटर अकाऊंट बंद असल्याची तक्रार केल्यानंतर हे अकाऊंट पुन्हा सुरू झाले, मात्र त्यानंतर काही दिवसांनंतर 19 जानेवारी 2018पासून ते पुन्हा बंद पडले ते अजूनही बंद आहे.

सुरू केली ट्विटर परंपरा
ताजमहाल अधिक लोकप्रिय व्हावा यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री अखिलेश यादव यांच्या सरकारने ऑगस्ट 2015मध्ये पहिल्यांदा ताजमहालचे ट्विटर अकाऊंट सुरू केले. अशा प्रकारे ट्विटरवर येणारी ही जगातील पहिली ऐतिहासिक वास्तू होती. त्यानंतर जगभरातील इतर ऐतिहासिक वास्तू आणि जागतिक आश्चर्य असलेल्या वास्तूंनी आपापली ट्विटर अकाऊंट सुरू केली.

आपली प्रतिक्रिया द्या