
रोगप्रतिकारशक्ती वाढली आजारांशी लढण्याची ताकद मिळते. यामुळे कोरोना, ओमिक्रॉन यासारख्या किंवा इतर संसर्गजन्य आजारांशी लढण्याकरिता डॉक्टर काढा पिण्याचा सल्ला देतात. काढ्यामुळे रोगप्रतिकारक्षमता वाढते, मात्र काढा बनवताना वापरण्यात येणाऱ्या औषधी घटकांचे प्रमाण चुकले तर त्याचे विपरीत परिणाम शरीरावर होऊ शकतात तसेच यावेळी अजाणतेपणे किंवा नकळत झालेल्या काही चुकांमुळे शरीरावर अपेक्षित परिणाम होत नाहीत. यामुळे काढा तयार करताना कोणत्या चुका टाळाव्यात तसेच काय काळजी घ्यावी याविषयी पाहूया –
– काढा पिणाऱ्या व्यक्तिचे वय, आरोग्य आणि ऋतु याबाबतही जागरुक असण्याची आवश्यकता आहे. ज्यांची प्रकृती नाजूक आहे अशांनी जर नियमित काढा प्यायला तर त्याचे शरीरावर विपरीत परिणाम होऊ शकतात. उदा. नाकातून रक्त येणे, तोंडात व्रण येणे, आम्लपित्त तसेच लघवी आणि पचनाच्या समस्या निर्माण होऊ शकतात. अशा समस्या उद्भवल्यास तात्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
– आजारांचा संसर्ग टाळता यावा यासाठी बनवण्यात येणाऱ्या काढ्यामध्ये बहुतांश लोक काळीमिरी, दालचिनी, हळद, गुळवेल, अश्वगंध, वेलची आणि सुंठ हे गरम मसाले (खडा मसाला) वापरतात. यामुळे शरीरातील उष्णता वाढते. हे पदार्थ शरीर उबदार ठेवण्यासाठी मदत करतात. त्यामुळे शरीराचे तापमान अचानक वाढून नाकातून रक्त येणे, अॅसिडिटी असे त्रास होऊ शकतात.
– काढा तयार करण्यासाठी वापरण्यात येणारे मसाल्याचे पदार्थ योग्य प्रमाणात घेणे आवश्यक आहे. काढा प्यायल्यानंतर जर तुम्हाला त्रास होत असेल तर दालचिनी, काळीमिरी, अश्वगंधा आणि सुंठ कमी प्रमाणात वापरा.
– सर्दी, खोकल्याने त्रस्त असलेल्यांकरिता काढा पिणे फायदेशीर असले तरी या बाबतीत काळजी घेणे आवश्यक आहे. ज्यांना पित्ताचा त्रास असतो त्यांनी काळीमिरी, सुंठ आणि दालचिनी या घटकांचा वापर जास्त प्रमाणात करू नये.
– नियमित काढा पित नसाल तर काढा कमी प्रमाणात प्या. काढा बनवताना पातेल्यात 100 मिली. पाणी घ्या. त्यानंतर आवश्यक ते पदार्थ त्या पाण्यात घालून पातेल्यात 50 मिली पाणी शिल्लक राहिपर्यंत उकळवणे आवश्यक आहे.



























































