बुलेट ट्रेनचा समुद्राखालील बोगदा खणायला पाच वर्षे लागणार, मुंबई ते अहमदाबाद बुलेट धावण्यासाठी 2027 साल उजाडणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पहिल्या टप्प्यात दहा डब्यांच्या 24 ट्रेन येतील.

एका ट्रेनची प्रवासी क्षमता 750.

2033 मध्ये 16 डब्यांची ट्रेन – क्षमता 1250 प्रवासी.

जपानच्या बुलेटचे ई-5 सीरिजचे डबे.

मुंबई ते अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाचे अंडरग्राऊंड बीकेसी स्थानक आणि समुद्राखालील टनेल खणण्यासाठी शुक्रवारी एकत्रित टेंडर निघाले आहे. टेंडर मंजूर झाल्याच्या तारखेपासून समुद्राखालून जाणारे भुयार खणण्यासाठीच तब्बल पाच वर्षे लागणार असल्याने 2027 साली हा बोगदा तयार होईल असे सूत्रांनी म्हटले आहे. त्यामुळे मुंबई ते अहमदाबाद या संपूर्ण पट्टय़ात बुलेट धावण्यासाठी 2027 साल उजाडणार आहे.

केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी मुंबई ते अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाचे मुंबई व महाराष्ट्रातील बांधकाम प्रचंड प्रमाणात रखडले आहे. बीकेसी स्थानक एकवेळ बांधून तयार होईल, परंतु या वांद्रे-कुर्ला संकुलातून समुद्राखालून बुलेटचा मार्ग जाणार आहे. आता स्थानक तसेच भुयारी मार्गाचा आराखडा आणि बांधकामासाठी फेरनिविदा निघाल्या असून त्या समजा सप्टेंबरमध्ये जरी मंजूर झाल्या तरी मंजूर झाल्याच्या तारखेपासून आणखीन पाच वर्षे अजस्त्र्ा टनेल मशीनला बोगदा खणायला लागतील असे नॅशनल हायस्पीड रेल कॉर्पोरेशनने म्हटले आहे. म्हणजे सप्टेंबर 2027 रोजी हे समुद्राखालील भुयार खणून तयार होईल. त्यामुळे मुंबई ते अहमदाबाद संपूर्ण टप्प्यात बुलेट ट्रेन चालविण्यासाठी घोडा मैदान अजून खूप दूर असल्याचे म्हटले जात आहे. त्यामुळे केंद्र सरकारला गुजरातच्या वापीपर्यंत बुलेट ट्रेन चालवून समाधान मानावे लागणार आहे.

तिवरांना कोणताही धोका नाही…

बुलेट ट्रेनच्या सुरुवातीचे बीकेसी स्थानक जमिनीखाली तयार होणार असून तेथूनच हा 21 कि.मी.चा बोगदा सुरू होत ठाण्याच्या खाडीखालून पुढे शिळफाटा ते विरार होत जाणार आहे. प्रत्यक्ष ठाण्याच्या खाडीखालून बोगद्याचा केवळ दोन कि.मी.चा भाग जाणार आहे. एकूण नऊ बोगदे या मार्गावर असून त्यातील आठ डोंगराळ भागात, तर एक समुद्राखालून नेला जात आहे. खाडीखालून बोगदा नेल्याने खाडीतील तिवरांना कोणताही धोका पोहचणार नसल्याचे म्हटले जात आहे.

प्रकल्प पांढरा हत्ती ठरणार?

सुरुवातीला हा प्रकल्प 2022 मध्ये स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात राष्ट्राला अर्पण करण्याची योजना होती; परंतु कोरोना व महाराष्ट्रातील भूसंपादन रखडल्याने हा प्रकल्प आता गुजरात निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वापीपर्यंत सुरू करण्याची योजना आहे. हा प्रकल्प रखडून जरी किंमत वाढली आणि तिकिटांचे दर जरी वाढले तरी आम्ही फेऱया वाढवून हा प्रकल्प ‘व्हायबल’ करू असे रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी सुरत येथील कार्यक्रमात म्हटले होते. परंतू हा प्रकल्प मुंबईला जोडल्याशिवाय ‘व्हायबल’ होणे शक्य नसल्याचे सूत्रांनी सांगितले.