
महाविकास आघाडी सरकारच्या काळात महाराष्ट्रात येऊ घातलेले वेदांता फॉक्सकॉन, बल्क ड्रग पार्क आणि एअरबससारखे चांगले प्रकल्प गुजरातला पळवले आणि आता विनाशकारी रिफायनरी प्रकल्प दडपशाही करून कोकणच्या माथी मारण्याचा घाट मिंधे सरकारने घातला असल्याचा घणाघात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज केला. प्रकल्प आणायचेच असतील तर चांगले प्रकल्प इथे आणा आणि वादग्रस्त प्रकल्प गुजरातला न्या, असे आव्हानच त्यांनी सरकारला दिले.
उद्धव ठाकरे यांनी आज रिफायनरीविरोधी बारसूवसीयांशी संवद साधून समस्या जाणून घेतल्या. बारसू प्रकल्पाची जागा आपण सुचवली असली तरी त्यावेळी आपल्याला या जागेबाबत आता गद्दारी करून फिरणाऱ्यांनी दिशाभूल करणारी माहिती दिल्याचे त्यांनी स्पष्ट केले. जागा सुचवली तरी हा प्रकल्प लोकांची डोकी फोडून राबवा, असे आपण सांगितले नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. संपूर्ण महाराष्ट्राचे पोलीस दल बारसूत आणून दहशत माजवली जात आहे. मात्र अशीच दडपशाही कराल तर संपूर्ण महाराष्ट्र एकजुटीने इथे उभा राहील असा इशाराही त्यांनी यावेळी दिला. यावेळी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, आमदार ऍड. अनिल परब, आमदार भास्कर जाधव, खासदार विनायक राऊत, सचिव मिलिंद नार्वेकर, आमदार रवींद्र वायकर, राजन साळवी, वैभव नाईक, युवासेना सचिव वरुण सरदेसाई, लोकसभा समन्वयक प्रदीप बोरकर, संपर्कप्रमुख सुधीर मोरे, जिल्हाप्रमुख विलास चाळके, संजय पुनस्कर, वेदा फडके उपस्थित होते.
कातळशिल्पांचा ठेवा
बारसूच्या परिसरात कातळशिल्पांचा ऐतिहासिक ठेवा आहे. या कातळशिल्पांची दखल ‘युनेस्को’ने घेतली. ही कातळशिल्प नष्ट करायची आहेत का? असा सवाल उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला. या कातळशिल्पांची पाहणीही त्यांनी यावेळी केली.
View this post on Instagram
लोकांचा सामना करा
मी इथे सुपारी घेऊन आलेलो नाही. मात्र काही दलाल आता इथे फिरत आहेत. कारण त्यांनी पैसा मिळवण्यासाठी जमिनीचे सौदे केले आहेत. प्रकल्प रद्द झाला तर घेतलेले पैसे परत द्यावे लागतील, अशी दलालांना भीती आहे. प्रकल्प चांगला असेल तर लोकांसमोर प्रेझेंटेशन का देत नाही, असा सवालही त्यांनी केला. स्थानिकांचा विरोध असेल तर शिवसेना तुमच्या पाठीशी ठाम उभी राहील, असे आश्वासही त्यांनी दिले. यावेळी उद्धव ठाकरे आगे बढो, हम तुम्हारे साथ है, एकच जिद्द रिफायनरी रद्द अशा घोषणा देण्यात आल्या.
प्रत्येक लाठीचा हिशोब
कोरोना काळात पोलिसांनी चांगले काम केले, पण आज मायबाप लोकांवर लाठी चालवताय. त्यांना तडीपार करताय. उद्या हे सरकार जाईल तेव्हा लोक त्यांचा हिशोब करतील. मी मुख्यमंत्री असताना सर्वांशी आदराने वागलो, पण जर माझ्या माताभगिनींशी कोण असं वागणार असेल तर वेळ येईल तेव्हा प्रत्येक लाठीचा हिशोब घेतला जाईल, असा कडक इशारा उद्धव ठाकरे यांनी दिला.
दडपशाही सुरू आहे, काहीतरी काळंबेरं आहे!
प्रकल्पासाठी ज्या प्रकारची दडपशाही सुरू आहे, त्यावरून यामध्ये नक्कीच काहीतरी काळंबेरं दिसत असल्याचेही ते म्हणाले. मला सरकारच्या खुर्चीचे पाय डगमगताना दिसत आहेत. स्थानिकांचा प्रकल्पाला विरोध असताना सरकारकडून एकही पाऊल मागे घेतलेले दिसत नाही. पण त्यांच्या खुर्चीचे पाय डगमगताना दिसत आहेत. हे सरकार लवकरच पडेल, असेही ते म्हणाले.
हुकूमशाही कराल तर महाराष्ट्र पेटवू
हुकूमशाही, जोरजबरदस्ती आणि लोकांची डोकी फोडून कोकणची राखरांगोळी करणारा प्रकल्प दामटवत असाल तर महाराष्ट्र पेटवू, असा इशाराही उद्धव ठाकरे यांनी सरकारला दिला. आपण प्रामाणिक आहोत, म्हणूनच आज इथे थेट येऊन रिफायनरीविरोधकांशी बोलू शकलो. तुमच्यात हिंमत असेल तर पोलीस फाटा बाजूला ठेकून स्थानिकांशी संवाद साधून दाखवा, असे आव्हानच त्यांनी सरकारला दिले.


























































