
सामना प्रतिनिधी। मानवत
मानवत येथे बसची दुचाकीला धडक बसल्याने झालेल्या अपघातात तलाठ्याचा जागीच मुत्यू झाला. तर एक जण गंभीर जखमी झाले. ही घटना आज दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास शहरातील तहसील कार्यालयासमोर राष्ट्रीय महामार्गावर घडली.
मानवत तालुक्यातील वझुर व हमदापुर सज्जाचे तलाठी दत्ता लालबा ढवळे (रा. वसमत) हे आपल्या तलाठी सज्जावरुन रामा दत्तात्रय निळे (रा. हमदापुर) यांच्या दुचाकी वाहनावरुन तहसील कार्यालयाकडे जात होते. ते राष्ट्रीय महामार्गावरून तहसील रस्त्यावर वळण घेते होते. त्याचवेळी पाथरी वरून मानवतकडे वेगाने येणाऱ्या माजलगाव-परभणी या शिवशाही बसने दुचाकीला उडवले. अपघातात दुचाकी पाठीमागे बसलेले दत्ता ढवळे यांच्या डोक्यास जबर मार लागल्याने रक्तस्राव होऊन जागेवरच मृत्यु झाला. तर रामा निळे हे गंभीर जखमी झाले. त्यांना ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. दरम्यान ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी डॉ. गजदत्त चव्हाण उपस्थित नसल्याने गंभीर जखमी असलेले निळे यांच्यावर तासभर कोणतेही उपचार करण्यात आले नाही. यावेळी ग्रामीण रुग्णालयात अतिरिक्त जिल्हाधिकारी आण्णासाहेब पाटील व उपविभागीय अधिकारी कोळी यांनी भेट देऊन वैद्यकीय अधिकारी डॉ नरेंद्र वर्मा यांना संपर्क साधून जाब विचारला. तलाठी ढवळे यांनी यापूर्वी लष्करात सेवा केली असून ते अतिशय मनमिळाऊ स्वभावाचे होते सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.































































