
145 जागांपैकी 4 जागेवर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील उमेदवार पात्र झालेत, बाकी 141 जागेवर परजिल्ह्यातील उमेदवार पात्र झाले आहेत. त्यामुळे ही तलाठी भरती प्रक्रिया नव्याने घेण्यात यावी, ही भरती प्रक्रिया नव्याने न घेतल्यास एकही नवीन तलाठी गावात हजर करू दिला जाणार नाही असा इशारा आमदार वैभव नाईक यांच्या उपस्थितीत कुडाळ तालुका युवा प्रमुख योगेश धुरी यांनी निवेदनाद्वारे सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी किशोर तावडे यांना दिला आहे.
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे आमदार आमदार वैभव नाईक यांच्या उपस्थितीत सोमवारी युवासेना तालुकाप्रमुख योगेश धुरी, युवासेना शहर प्रमुख संदिप म्हाडेश्वर, अमित राणे, अविनाश नारकर यांच्या शिष्टमंडळाने ओरोस येथे जिल्हाधिकारी किशोर तावडे यांची भेट घेतली. यावेळी आमदार वैभव नाईक यांनी या तलाठी भरती बाबत जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा केली.
धुरी यांनी जिल्हाधिकार्यांना दिलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील हजारो मुलांनी तलाठी भरतीचा हा परिक्षा फॉर्म भरला होता. परंतु त्यांच्या पदरी निराशा पडली. इयत्ता 10 वी. इयत्ता 12 वीत सिंधुदुर्ग जिल्हा महाराष्ट्रात अव्वल असतो. एवढा चांगला बुध्यांक असून सुध्दा स्पर्धा परीक्षेत मात्र आपल्या जिल्ह्यातील मुलांना यश का मिळत नाही ही संशोधनाची बाब आहे. तलाठी भरती ही नव्याने घेण्यात यावी, या भरतीत घोटाळा झाला आहे तसेच भरती प्रत्येक जिल्हावार घेण्यात यावी अशी आमची मागणी असल्याची माहिती शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे युवा सेनेचे तालुकाप्रमुख योगेश धुरी यांनी दिली.
तलाठी भरती परीक्षा 200 गुणांची होती मात्र काही परजिल्ह्यातील परीक्षार्थींना 200 पैकी 203, 200.80, 199.80 असे मार्क्स पडलेत याबाबत आपण तसेच निवासी जिल्हाधिकारी यांनी खुलासा करावा कारण आपल्या सही शिक्यांसह ही निवडप्रक्रिया यादी झाली आहे. त्यामुळे सदर भरती ही बोगस आहे असा आमचा संशय आहे. ज्या कंपनीने ही परीक्षा प्रक्रिया केली त्यांनी सर्व ऑनलाईन परीक्षा पेपरची माहिती उघड करावी. तसेच जिल्ह्यातुन परीक्षेला बसलेल्या अपात्र झालेल्या मुलांची परीक्षा फी वापस करावी. या भरतीमुळे जिल्ह्यातील मुलांच मानसिक खच्चीकरण झालेल आहे. जर काय आत्महत्येसारखे प्रकार घडल्यास त्यास आपण तसेच सरकार आणि संबंधित खासगी कंपनी जबाबदार राहील. तलाठी भरती प्रक्रिया नव्याने न झाल्यास एकही तलाठी गावात हजर होवू देणार नाही असा इशारा युवासेनेने दिला आहे.




























































