पंजशीर प्रांतावर ताबा मिळवण्याच्या आनंदात हवेत गोळीबार, लहान मुलांसह अनेकांचा मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

तालिबानने अफगाणिस्तानवर कब्जा मिळवल्यानंतर तिथे दहशतीचं आणि घबराटीचं वातावरण पसरलं आहे. तिथल्या सर्वसामान्य नागरिकांचा मृत्यू कधी आणि कसा होईल हे कोणीही सांगू शकत नाही. शुक्रवारी रात्री घडलेल्या घटनेमुळे हे पुन्हा एकदा सिद्ध झालं आहे. तालिबानने त्यांना कडवा विरोध करणाऱ्या तिथल्या बंडखोरांकडून पंजशीर प्रांत बळकावला असून आता संपूर्ण अफगाणिस्तान आपल्या ताब्यात आल्याचं त्यांनी जाहीर केलं. याचा आनंद साजरा करण्यासाठी तालिबानी दहशतवाद्यांनी हवेत गोळीबार केला, ज्यात 2 लहान मुलांसह अनेकांचा मृत्यू झाला आहे.

तालिबानी दहशतवाद्यांच्या गोळीबारानंतर रुग्णालयात दाखल झालेल्या जखमींची संख्या वाढायला लागली आहे. तिथले ऑपरेशन थिएटर्सही भरली असल्याने एका व्यक्तीचं ऑपरेशन हे इमर्जन्सी रुममध्ये करण्यात आलं. एकीकडे हे सगळं ऐकायला मिळत असताना दुसरीकडे पंजशीर वाचवण्यासाठी झुंजणाऱ्या बंडखोरांनी तालिबानने पंजशीरवर ताबा मिळवला नसल्याचं म्हटलंय. तालिबानचा दावा चुकीचा असून पंजशीर अजूनही आपल्या ताब्यात असल्याचं बंडखोरांनी म्हटलंय. या बंडखोरांच्या दलाला प्रतिकार दल असं म्हटलं जात आहे. या प्रतिकार दलाने दावा केला आहे की त्यांनी तालिबानचे जबर नुकसान केले आहे. पंजशीर प्रांतातील अहमद मसूद आणि अफगाणिस्तानचे माजी उपराष्ट्रपती अमरुल्लाह सालेह यांनी तालिबानच्याविरोधात मोर्चा उघडला असून तालिबानने सुरुवातीला त्यांच्याशी चर्चा करण्याचा प्रयत्न केला, मात्र हे दोघे आपल्या भुमिकांवर ठाम असल्याने तालिबान्यांनी त्यांचे दहशतवादी पंजशीरवर हल्ला करण्यासाठी पाठवले होते.

तालिबानचा कश्मीरवर डोळा

अफगाणिस्तानवर कब्जा मिळविल्यानंतर तालिबानने आता आपले विखारी दात दाखवायला सुरुवात केली आहे. तालिबानची नजर आता कश्मीरवर आहे. हिंदुस्थानातीलच नव्हे तर कुठल्याही देशातील मुस्लिमांसाठी आवाज उठवण्याचा आम्हाला अधिकार आहे, असे वक्तव्य तालिबानचा प्रवक्ता सुहैल शाहीनने केले आहे.कश्मीरचा मुद्दा हिंदुस्थान आणि पाकिस्तानमधील अंतर्गत बाब आहे. त्यांनी यासाठी अफगाणिस्तानचा वापर करू नये. तालिबानला शेजारील देशांशी संबंध हवे आहेत, असे तालिबानचा नेता शेख मोहम्मद अब्बास स्टानिकझई याने तीन दिवसांपूर्वी म्हटले होते. परंतु तालिबानचा खरा चेहरा आता उघड होत आहे.

मुल्ला बरादरकडे जाणार नेतृत्व

तालिबानकडून लवकरच सरकार स्थापनेची घोषणा होणार असून मुल्ला बरादर हा राष्ट्रपती होण्याची दाट शक्यता आहे. बरादर हा तालिबानच्या राजकीय कार्यालयाचे नेतृत्व करतो. बरादरबरोबरच मुल्ला मोहम्मद याकूबकडेही महत्त्वाची जबाबदारी दिली जाईल. तालिबानचा म्होरक्या मोहम्मद अब्बास स्टानिकझईलाही हा सुप्रीम लिडर म्हणून काम पाहील, असे वृत्त रॉयटर्सने दिले आहे.

तालिबानविरोधकांना आश्रय दिला तर महागात पडेल

तालिबानविरोधकांना हिंदुस्थानने आश्रय दिला तर महागात पडेल, अशी धमकी तालिबानी नेता गुलबुद्दीन हेकमत्यारने दिली आहे. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्याने ही दर्पोक्ती केली. अफगाणिस्तानच्या नवीन राज्यकर्त्यांना कश्मीरमध्ये रस नाही. त्यामुळे हिंदुस्थानने चिंता करू नये. पण तालिबानविरोधकांना आश्रय देऊ नये. गेल्या चार दशकांतील चुका हिंदुस्थानने दुरुस्त कराव्यात. यापूर्वी सोवियत युनियन आणि अमेरिकेच्या हल्ल्याचे समर्थन हिंदुस्थानने केले होते, असे हेकमत्यार म्हणाले.