‘त्यांनी’ मला बेशुद्ध होईपर्यंत चाबकाने फोडून काढले, महिला खासदाराचा गौप्यस्फोट

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

अफगाणिस्तामध्ये दहशतवादी संघटनांनी माजवलेला विध्वंस संपूर्ण जगाने पाहिला आहे. आजही येथील अनेक भागात तालिबानचे वर्चस्व दिसून येते. सध्या तालिबानसोबत शांततेसाठी चर्चेची रस्ते खुले असले तरी येथील महिला आजही त्यांच्या नावाने थरथर कापतात. तालिबानने या देशाला एखाद्या किडीसारखे पोखरून काढले आहे. तालिबान काळात अफगाणिस्तानामध्ये महिलांना दुय्यम वागणूक दिली गेली. आजही ते दिवस आठवून महिला थरथर कापताना दिसत. मग त्या सामान्य महिला असो की राजकारणातील.

अमेरिकेने अफगाणिस्तानातून सैन्य मागे घेण्याची घोषणा केली, तेव्हापासून येथील परिस्थिती पुन्हा बिघडत आहे. तालिबानांची कबर खोदणारी अमेरिका सध्या त्यांच्यासोबत शांततेची चर्चा करण्यासाठी अग्रेसर आहे. परंतु अमेरिकेच्या या राजकारणामुळे येथील लोकांमध्ये मात्र चिंतेचे वातावरण आहे. कारण तालिबानचे नाव काढताच महिला खासदार रहिमा जमी ही देखील भितीने कापते. तालिबानने केलेल्या अत्याचाराच्या जखमा तिच्या मनावर आजही कायम आहेत.

न्यूयॉर्क टाइम्सशी बोलताना रहिमा यांनी आपले दु:ख व्यक्त करत त्या दिवसातील आठवणी सांगितल्या. 1996 मध्ये त्या शिक्षकाचे काम करत होत्या. याच दरम्यान त्यांच्यावर नोकरी सोडण्यासाठी सातत्याने दबाव टाकला जात होता. तसेच त्यांना धमक्याही देण्यात येत होत्या. त्या घरातून बुरखा घालून बाहेर पडत आणि कडक उन्हात काम करत. याच वेळी त्यांना तालिबानने ओळखले आणि घेरले. कारण चालताना बुरखा थोडा वर जात होता आणि त्यांचे पाय दिसत होते, याच कारणामुळे तालिबानने त्यांना घोड्यांच्या चाबकाने बेशुद्ध होईपर्यंत मारले होते. तसेच तरुण महिलांवर बलात्कार आणि धार्मिक कारण देत महिलांना गोळ्या घालण्याचे प्रकार सातत्याने होत होते, असेही रहिमा यांनी सांगितले.