बुरखा न घातल्याने महिलेला गोळ्या घातल्या, महिलेसोबत तालिबान्यांच्या आश्वासनांचाही मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

तालिबानच्या दहशतवाद्यांनी एका महिलेला गोळ्या घालून ठार मारलंय. बुरखा न घातल्याने या महिलेची हत्या करण्यात आली. विशेष बाब ही आहे की ज्या दिवशी अफगाणिस्तानवर ताबा मिळवणाऱ्या तालिबानी नेत्यांनी दावा केला महिलांच्या अधिकारांचा सन्मान केला जाईल त्याच दिवशी ही हत्या करण्यात आली आहे.

यापूर्वी तालिबान राजवटीत अफगाणी महिलांवर सर्वाधिक बंधने लादली होती. अत्याचार केले गेले. घराबाहेर पडण्यास मज्जाव करण्यात आला. मात्र तालिबानचा प्रवक्ता झाबीहुल्लाह मुजाहीद मंगळवारी पहिल्यांदा पत्रकारांसमोर आला. तालिबान कोणाचा बदला घेणार नाही. सर्वांना माफ करू. आमच्या सरकारमध्ये महिलांचाही समावेश असेल. शरियत कायद्यानुसार महिलांना स्वातंत्र्य दिले जाईल, असे तो म्हणाला होता. ताखर भागात ही घटना घडली असून, रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या महिलेचा फोटो प्रसिद्ध झाला आहे. महिलेच्या शेजारी तिचे नातेवाईक रडत असताना या फोटोमध्ये दिसतं आहे. फॉक्स न्यूजने याबाबतचे वृत्त दिले आहे.

तालिबान्यांनी सहजपणे घशात घातलेल्या अफगाणिस्तानचे काय होणार? अराजक कधी थांबणार? तेथील नागरिकांच्या जिवाचे काय? या सर्व प्रश्नांचे उत्तर सध्यातरी अल्लाह भरोसे असेच आहे. कारण या भयंकर स्थितीला अफगाणी नेतेच जबाबदार असल्याचे सांगत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी हात झटकले आहेत. दरम्यान, जीव वाचविण्यासाठी देश सोडून जाण्याकरिता हजारो नागरिकांची काबूल विमानतळावर गर्दी कायम आहे. अमेरिकन लष्कराचे कार्गो विमान तब्बल 640 अफगाण नागरिकांना घेऊन कतारमध्ये गेल्याचे विदारक दृष्य अवघ्या जगाने पाहिले.

रविवारी तालिबानी दहशतवाद्यांनी राजधानी काबूलचा कब्जा घेतल्यापासून अफगाणिस्तानात अराजक माजले आहे. भयंकर रक्तपात झाल्याचे वृत्त नसले तरी दहशत वाढली आहे. लोक प्रचंड भयभीत आहेत. रस्त्यांवर तालिबानी बंदुका घेऊन फिरत आहेत. विरोध करणारे काही राजकीय नेते, पत्रकार, लेखक, सामाजिक कार्यकर्ते यांचा शोध सुरू केला असून घरोघरी जाऊन झडती घेतली जात आहे. तर दुसरीकडे विनाव्हिसा, विनातिकीट आपले घरदार, व्यवसाय सोडून हजारो नागरिकांनी काबूल विमानतळावर गर्दी केली आहे.

पाकिस्तान, चीन वगळता अनेक देशांचे दूतावास बंद

तालिबानला पाठिंबा देणाऱ्या पाकिस्तान, चीन तसेच रशिया वगळता इतर देशांनी अफगाणिस्तानातील आपले दूतावास बंद केले आहेत. अमेरिका, ब्रिटन, जर्मनी, स्विडनसह अनेक देशांनी आपल्या नागरिकांना मायदेशी घेऊन जाण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.

यापूर्वी तालिबान राजवटीत अफगाणी महिलांवर सर्वाधिक बंधने लादली होती. अत्याचार केले गेले. घराबाहेर पडण्यास मज्जाव करण्यात आला. मात्र तालिबानचा प्रवक्ता झाबीहुल्लाह मुजाहीद मंगळवारी पहिल्यांदा पत्रकारांसमोर आला. तालिबान कोणाचा बदला घेणार नाही. सर्वांना माफ करू. आमच्या सरकारमध्ये महिलांचाही समावेश असेल. शरियत कायद्यानुसार महिलांना स्वातंत्र्य दिले जाईल, असे तो म्हणाला. सर्व सरकारी कर्मचाऱ्यांनी कामावर हजर व्हावे, असा आदेशही तालिबानने दिला आहे.

अमेरिकन विमानात तब्बल 640 जण

सोमवारी विमानाला लटकताना अफगाण नागरिकांचे दृष्य होते. आज अमेरिकन लष्कराच्या कार्गो विमानात तब्बल 640 जण दाटीवाटीने बसले. ट्रकमध्ये बसावे तशी विमानात गर्दी झाली होती. महिला, लहान मुलेही होती. या सर्वांना कतार विमानतळावर सोडण्यात आले.

हिंदू, शीख नागरिकांसाठी ई-इमर्जन्सी व्हिसा

अफगाणिस्तानातील नागरिकांची हिंदुस्थानला काळजी आहे. त्यांना हिंदुस्थानात येण्यासाठी ई-इमर्जन्सी व्हिसा सुविधा निर्माण केली आहे. ऑनलाईन ते अर्ज करू शकतात. आम्ही अफगाणमधील शीख आणि हिंदू समाजाच्या नेत्यांच्या संपका&त आहोत असे परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे. मंगळवारी रात्री पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली सुरक्षाविषयक पॅबिनेट कमिटीची बैठक झाली. गृहमंत्री अमित शहा, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

हिंदुस्थानी सुरक्षित परतले

प्रचंड अफरातफरीमुळे सोमवारी काबूल येथील हमीद करझाई आंतरराष्ट्रीय विमानतळ बंद करण्यात आले होते. त्यामुळे अफगाणिस्तानात अडकलेल्या हिंदुस्थानींना आणण्यासाठी गेलेले हवाईदलाचे दोन सी-17 ग्लोबमास्टर विमानांना उड्डाण करता आले नाही. तसेच विमानतळापासून अवघ्या 20 किलोमीटरवर असलेल्या दूतावासातील कर्मचाऱ्यांना विमानतळावर कसे आणायचे? हा सुरक्षेचाही प्रश्न होता. मात्र, सोमवारी रात्रीच सर्व कर्मचाऱ्यांना विमानतळावर आणण्यात आले. रात्री उशीरा सी-17च्या एका विमानाने उड्डाण केले. त्यात 40 हिंदुस्थानी होते. मंगळवारी सकाळी राजदूत, राजनैतिक अधिकारी, कर्मचारी, दोन पत्रकार, 30 नागरिकांना घेऊन दुसऱ्या सी-17 विमानाने उड्डाण केले.

सुरक्षेसाठी पाकचा हवाई मार्ग टाळला

120 जणांना घेऊन येणाऱ्या हवाईदलाच्या सी-17 ग्लोबमास्टर विमानाने सुरक्षेची पूर्ण काळजी घेतली. अफगाणचा बहुतांशी भाग आणि पाकिस्तानचा एअरस्पेस पूर्णपणे टाळण्यात आला. हे विमान काबूलहून इराणमार्गे हिंदुस्थानात आले. गुजरातच्या जामनगर विमानतळावर इंधनासाठी काहीकाळ थांबल्यानंतर सायंकाळी पाच वाजता दिल्लीत पोहोचले. यावेळी ‘वंदे मातरम्’, ‘भारत माता की जय’च्या घोषणा देण्यात आल्या.

उत्तर प्रदेशातील 17 जणांसह अनेकजण काबूलमध्येच

दूतावासातील सर्व कर्मचारी आणि जवानांना मायदेशी आणण्यात आले असले तरी, आणखी अनेक हिंदुस्थानी काबूल आणि परिसरात अडकलचे वृत्त आहे. अफगाणिस्तानात रोजगारासाठी गेलेले उत्तरप्रदेशातील चंदौली जिह्यातील 17 जण काबूलमध्येच फसले आहेत. तसेच इतर राज्यातील काही नागरिकही तेथे अडकले आहे. त्यांचे कुटुंबिय चिंतेत असून, त्यांना लवकरात लवकर सुखरूप मायदेशी आणावे, अशी मागणी होत आहे.