कराड-विटा मार्गावरील तांबवे पूल 14 ऑगस्ट रोजी पहाटे कोसळला

533

कराड-विटा मार्गावरील वाहतुकीसाठी  बंद करण्यात आलेला तांबवे येथील पूल १४ ऑगस्ट रोजी पहाटे कोसळला. कराडमधील हा दुसरा पूल कोसळला आहे. दरम्यान पुलावरील वाहतूक बंद असल्याने अनर्थ टळला आहे. जुना कृष्णा पूल कोसळल्याने कराड तालुक्यातील तांबवे येथील धोकादायक पुलाबाबत नागरिकांच्या मनामध्ये साशंकता निर्माण झालेली होती. नेमका तोच पूल कोसळला.

कोयना नदीवरील तांबवे पूल वाहतुकीसाठी धोकादायक झाला होता. सुमारे पाच वर्षापूर्वी झालेल्या स्ट्रक्चरल ऑडिटमध्येही ही गोष्ट समोर आली होती. त्यानंतर काही महिने या पुलावरील अवजड वाहतूक बंद करण्यात आली होती. मात्र, नवीन पुलाचे रखडलेले काम आणि ग्रामस्थांना सुमारे आठ ते नऊ किलोमीटर जादा प्रवास करावा लागत होता. बांधकाम विभागाने पुलावर सुरूवातीला मध्यभागी रस्त्यावर लावलेले लोखंडी अँगल काढून जीव धोक्यात घालून तांबवेसह परिसरातील १२ गावातील लोक या पुलावरून  प्रवास करत होते.

तांबवेतील एका युवकाने २४ जुलै २०१९ रोजी धोकादायक पुलाचे आणि खचलेल्या पुलाच्या दगडी पिलरचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल केले होते. यांची दखल घेवून २९ जुलैला धोकादायक पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता. दरम्यान, ३० जुलैनंतर मुसळधार पावसामुळे कोयना नदीला महापूर आल्याने हा पूल पाण्याखाली गेला होता. दोन दिवसांपूर्वी या पुलावरील पुराचे पाणी ओसरले होते. मात्र असे असले तरी कोयना नदी अजूनही दुथडी भरून वाहत असून पुलाचा गावाच्या बाजूचा पिलर कोसळून पुल पडला. पुलावरील वाहतूक सुरू असती तर मात्र मोठा अनर्थ झाला असता.

आपली प्रतिक्रिया द्या