
आपल्याकडे बैलगाडा शर्यतीला वलय आहे, तसेच दाक्षिणात्य राज्यांमध्ये जल्लीकट्टूला आहे. अर्थात हे दोन्ही खेळ धोकादायक असले तरी काही अटी-शर्तींसह न्यायालयाने त्यास परवानगी दिलेली आहे. दक्षिणेकडे जल्लीकट्टुचा उत्साह किती आहे हे येथे एका बैलाला मिळालेल्या किमतीवरून दिसते.
तमिळनाडूच्या एका शेतकऱ्याने आणि जल्लीकट्टु खेळाच्या दर्दी चाहत्याने कर्नाटकातील एका शेतकऱ्याकडून 19 लाख रुपये मोजून एक बैल खरेदी केला आहे. ‘ब्रह्मा’ असे या बैलाचे नाव असून त्याला आलिशान कारपेक्षाही जास्त किंमत मिळाली आहे. साधारणत: जल्लीकट्टुसाठीच्या बैलांच्या किमती 75 हजार ते 1 लाख असतात, परंतु ‘ब्रह्मा’चा धिप्पाड देह आणि वाऱ्याचा वेग यामुळे त्याला मोठी किंमत मिळाली आहे.
कर्नाटकातील हावेरी जिल्ह्यातील हंगलजवळील वासना गावातील मल्लेशप्पा हलगज्जनवरा याने चार वर्षांपूर्वी 1.25 लाख रुपयांना एक बैल खरेदी केला होता. आठ वर्षाच्या या बैलाने अनेक शर्यतींमध्ये आपली कमाल दाखवली आहे. तसेच जल्लीकट्टुमध्ये त्याच्यावर अंकुश लावण्यात कोणाला यश आलेले नाही. त्यामुळे जल्लीकट्टु खेळ आवडणारे सर्वच त्याच्या प्रेमात पडले असून हावेरी जिल्ह्यासह अन्य जिल्ह्यांमध्येही ‘ब्रह्मा’ने अवॉर्ड जिंकले आहेत. 250 मीटरचे अंतर ‘ब्रह्मा’ अवघ्या 8 ते 9 सेकंदामध्ये कापतो, असे मल्लेशप्पा याने सांगितले.
‘ब्रह्मा’ला आता तमिळनाडूतील वेल्लोर जिल्ह्यातील कटपाडी येथील नवीन याने खरेदी केले आहे. यासाठी त्याने 19 लाख रुपये मोजले असून 6 लाख रुपयांचे टोकन दिले आहे. ‘ब्रह्मा’ नावाचा हा बैल अमृतमहल आणि हल्लीकर यांची मिश्र जात आहे.
नवीन बऱ्याच काळापासन ‘ब्रह्मा’च्या कामगिरीवर नजर ठेऊन होता. त्यानंतर त्याने मल्लेशप्पा याच्याशी संपर्क साधला. तमिळनाडूमध्ये आयोजित होणाऱ्या जल्लीकट्टु स्पर्धांमध्ये ‘ब्रह्मा’ला उतरवण्याची योजना नवीनने आखली आहे.





























































