
तापोळा येथील पर्यटनवाढीसाठी चालना देणाऱया शिवसागर जलाशयावर अत्याधुनिक जर्मन तंत्रज्ञानावर आधारित केबल स्टे पूल व त्या पुलावर 43 मीटर उंचीवर प्रेक्षागॅलरी असलेला 540 मीटर लांबीच्या पुलाचे बांधकाम सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने सुरू करण्यात आले आहे.
महाराष्ट्राचे नंदनवन म्हणून महाबळेश्वर जगप्रसिद्ध आहे. येथे दरवर्षी साधारण 20 लाख पर्यटक भेट देऊन निसर्गसौंदर्याचा आनंद लुटतात. येथे पर्यटकांना आकर्षिक करण्यासाठी ठाकरे सरकारने तापोळा येथील शिवसागर जलाशयावर तापोळा ते अहिर यादरम्यान पूल बांधण्याचा निर्णय घेतला आहे. या पुलाच्या बांधकामाला 175 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. हा पूल तापोळा ते अहिर असा एकूण 540 मीटर लांब 14 बाय 15 मीटर रुंद आहे. शिवसागर जलाशयात पूर्ण क्षमतेने पाणी भरल्यानंतर पाण्याच्या पातळीपासून केबल स्टे पूल हा 11 मीटर उंच असेल. या पुलाच्या दोन्ही बाजूला 2 बाय 65 मीटर लांबीचे फुटपाथ असणार आहे. पुलाच्या मध्यभागी पायलॉनवर पुलापासून 43 मीटर उंचीवर प्रेक्षागॅलरी बांधण्यात येणार आहे.
या प्रेक्षक गॅलरीवर उभे राहून पर्यटकांना तापोळा परिसरातील निसर्गसौंदर्याचा आनंद लुटता येणार आहे. या प्रेक्षागॅलरीवर पोहोचण्यासाठी दोन्ही बाजूला कॅप्सूल लिफ्ट, तसेच जिनादेखील तयार करण्यात येणार आहे. पुलाच्या दोन्ही बाजूला साडेपाच मीटर रुंदीचे डांबरी रस्ते तयार करण्यात येणार आहेत. पर्यटकांच्या सोयीसाठी तापोळा येथे भव्य वाहनतळ बांधण्यात येणार असून, तापोळा व अहिर येथे सुलभ शौचालयाचीही सोय करण्यात येणार आहे.
अहिरला गावाला जाण्यासाठी 13 कि.मी. अंतर कमी होणार
शिवसागर जलाशयापलीकडील अहिर येथे जाण्यासाठी या पुलाचा फायदा होणार असून, साधारणतः 13 कि.मी. अंतर कमी होणार आहे. याचा फायदा जलाशयापलीकडे असलेल्या लोकांना तापोळा, महाबळेश्वर व सातारा येथे जवळच्या मार्गाने जाता येईल. वाहतुकीसाठी सध्या वापरात असलेला धोकादायक जलप्रवास टाळता येईल, शिवाय वेळेची बचत होणार आहे. या पुलामुळे सोळशी खोरे, कांदाटी खोरे व कोयना खोरे यांचा काही भाग जवळच्या मार्गाने जोडला जाणार आहे. नैसर्गिक आपत्तीवेळी जलाशयापलीकडील गावांत मूलभूत सोयीसुविधा तातडीने पोहोचविणे शक्य होणार आहे.
दोन वर्षांत काम पूर्ण करणार
या पुलाच्या बांधकामाला प्रारंभ झाला असून, काम प्रगतिपथावर आहे. पुणे येथील मे. टी ऍण्ड टी इन्फ्रा प्रा. लि. कंपनीने या कामाचा ठेका घेतला असून, कामाची मुदत 3 वर्षांची आहे. मात्र, हे काम 2 वर्षांतच पूर्ण करण्याचे ध्येय सार्वजनिक बांधकाम विभागाने ठेवले आहे. या कामावर सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता मुणगीलवार, कार्यकारी अभियंता सोनावले व उपविभागीय अभियंता महेश गोंजारी लक्ष ठेवून आहेत.

























































