
>> तरंग वैद्य
‘कफस’ म्हणजे कैदखाना, बंदिगृह, पिंजरा. अन्यायाविरुद्ध बोललो तर सार्वजनिक त्रास आणि गप्प राहिलो तर मानसिक त्रास हे मानसिक द्वंद्व एका हताशेच्या पिंजऱयात आपल्याला कैद करते. ही जणू आपणच याला सामोरे जात आहोत असे भासवणारी कफसची कथा बघताना आणि बघून झाल्यावर आपल्याला विचार करण्यास भाग पाडते.
‘कफस’… ह़ॉटस्टार ओटीटीवर 23 जून 2023 रोजी आलेल्या वेब सीरिजचे नाव. एकूण भाग सहा आणि प्रत्येक भाग 40 मिनिटांचा. शर्मन जोशी, मोना सिंगसारखी नावाजलेली नावं. सर्वात आधी शब्दकोश हातात घेऊन ‘कफस’ या शब्दाचा अर्थ शोधला. ‘कफस’ म्हणजे कैदखाना, बंदिगृह, पिंजरा (ज्यात आपण पशुपक्षी कैद करून ठेवतो) आणि मगच मालिका बघायला सुरुवात केली.
नवरा-बायको, 15-17 वयोगटांतील मुलगी आणि मुलगा… चौकोनी कुटुंब. नवरा एका सिनेमागृहाचा मॅनेजर, तर बायकोची पार्लरमध्ये नोकरी, भाडय़ाचे घर. थोडक्यात मध्यमवर्गात मोडणारा परिवार. सुरुवात होते या परिवारातील मुलगा सनी वशिष्ठ, ज्याला एका मोठय़ा चित्रपटात बालकलाकाराची, पण मोठी भूमिका मिळाली आहे व श्रीलंकेत त्याचे चित्रीकरण संपवून तो घरी येत आहे इथपासून. आई-वडील उत्साहात, मित्रपरिवार, इमारतीत राहणारे पण आनंदात. सगळे त्याच्या स्वागतासाठी त्याची वाट बघत आहेत. शेवटी सर्वांनाच सिनेविश्वाचे आकर्षण आणि कुतूहल आहे.
सनी घरी येतो. त्याचे जंगी स्वागत होते, पण तो आनंदी दिसत नाही. सगळय़ांना वाटतं की, तो दमून आलाय, पण रात्री तो त्याच्या आईवडिलांना जे काही सांगतो तिथपासून खऱया अर्थाने कथा सुरू होते. सनी जे काही सांगतो ते भयंकर असते. त्याविरुद्ध पार करून आपलीच बदनामी होईल, परिवाराचे भविष्य अंधकारमय होईल या विचारांनी आई-वडील गप्प रहायचा प्रयत्न करतात, पण स्वस्थ बसू शकत नाहीत. प्रकरणाला तोंड फुटते, पण शेवटी पैसे देऊन त्यांचे तोंड बंद केले जाते. पालकही ‘झाले ते विसरा’ या विचाराने नवीन जागेत राहायला जातात, मुलाला नवीन शाळेत घालतात (तोंड बंद ठेवण्यासाठी भरपूर पैसे मिळाले असतात ना). उद्देश एकच… सगळं नवीन केलं की, जुनं विसरलं जाईल, पण इथे त्याच्या विपरीत घडतं. मुलाचा समज होतो की, त्याच्या पालकांनी प्रकरणाचा ‘सौदा’ केला आहे. नात्यातील गुंतागुंत वाढत जाते. एवढं मोठं घर असूनही मोकळा श्वास मिळत नाही. एखाद्या पिंजऱ्यात किंवा कैदेत आहोत असं घरातील प्रत्येक सदस्याला वाटू लागतं आणि मग प्रत्येक आपापल्यापरीने त्यातून सुटकेसाठी प्रयत्न करू लागतो.
कथा वेगळी आहे, बऱ्याच वेळा ‘दिसतं तसं नसतं’ हे दाखवून देणारी आहे. अन्यायाविरुद्ध बोललो तर सार्वजनिक त्रास आणि गप्प राहिलो तर मानसिक त्रास हा द्वंद्व दाखवणारी आहे. कथा चांगल्या पद्धतीने हाताळली आहे आणि कुठेही कंटाळा येणार नाही या पद्धतीने बांधली आहे. मोना सिंग (मला ही ‘जस्सी’ म्हणूनच डोळय़ांसमोर येते) मध्यमवर्गीय गृहिणी व अर्थातच सनीच्या आईच्या भूमिकेत आहे. सर्वसामान्यांप्रमाणे श्रीमंतीची स्वप्ने बघणारी आणि परिस्थितीशी जुळवून घेणारी भूमिका तिने सहज रंगवली आहे, पण पुढे आयुष्यात येणारे कठीण प्रसंग, आलेल्या संकटाशी लढणे, त्यावर तोडगा काढायचा प्रयत्न करणे, परिवार तुटू नये यासाठी प्रयत्न करणे अशा अनेक लढाया तिने छान लढल्या आहेत. शर्मन जोशीच्या वाटय़ाला यापूर्वी विनोदी भूमिका जास्त आल्या आहेत. इथे मात्र परिस्थितीशी लढणारा, मुलांच्या भविष्याची चिंता करणारा बाप अशी गंभीर भूमिका त्याला मिळाली आहे. आपण काहीच करू शकत नाही ही खदखद त्याने सतत दाखवून दिली आहे. त्यामुळे आपण नकळत त्याच्या पाठीशी उभे राहतो, त्याला समजून घेतो आणि सहानुभूती दाखवतो.
मालिकेत मध्यवर्ती भूमिका अर्थातच सनी वशिष्ठची आहे. शाळा, मित्र, मस्ती व धमाल करण्याच्या वयात त्याला भयंकर प्रसंगाला सामोरे जावे लागते आणि त्याचे आयुष्यच बदलते. ही भूमिका खूप आव्हानात्मक आहे. कारण ही भूमिका करणारा मिखाईल गांधी मस्ती व धमालच्या वयातला, पण त्याने दिलेले आव्हान छान पेलले आहे हे नक्की. विवान भातेनाने मोठय़ा अभिनेत्याचे हावभाव व भूमिकेला लागणारा माज व्यवस्थित दाखवला आहे.
मालिकेच्या शेवटच्या भागात पत्रकार परिषद दाखवली आहे. त्यात काय घडणार याचा अंदाज लगेच येतो, पण शेवटच्या दृश्यात इतर लोकही पुढे येत आहेत हे दाखवून लोक जागरूक होत आहेत हा सकारात्मक दृष्टिकोन ठेवत मालिका संपवली आहे.
ही अशी मालिका आहे, जी बघताना आणि बघून झाल्यावर आपल्याला विचार करण्यास भाग पाडते. आपल्या मित्रपरिवारात किंवा ओळखीच्या व्यक्तीच्या आयुष्यात असे काही घडले तर आपली प्रतिक्रिया काय असेल? आपले विचार आणि मालिकेतील पात्रांचे विचार सारखेच आहेत का? असे प्रश्न आपण स्वतलाच विचारत असतो. त्यामुळे शेवटाचा अंदाज आला असला तरी मालिका आपले मन जिंकते हे नक्की.
(लेखक सिनेदिग्दर्शक व पटकथाकार आहेत)





























































