टाटा पॉवर देशभरातील एचपीसीएलच्या पेट्रोल पंपावर चार्जिंग स्टेशन उभारणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

विजेवरील वाहनांच्या चार्जिंगचे आता टेन्शन असणार नाही. इलेक्ट्रिक व्हेईकलधारकांना आपल्या सोयीने कधीही आपली गाडी चार्ज करता यावी म्हणून टाटा पॉवर हिंदुस्थान पेट्रोलियमच्या पेट्रोल पंपावर चार्जिंग स्टेशन उभारणार आहे. त्याबाबत टाटा पॉवरने एचपीसीएलसोबत करार केला आहे.

देशात विजेवर चालणाऱया वाहनांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्या पार्श्वभूमीवर टाटा पॉवरने आतापर्यंत देशातील प्रमुख 100 शहरांत 500 हून अधिक इलेक्ट्रिक व्हेईकल चार्जिंग स्टेशन उभारली आहेत. त्यानंतर आता लांब पल्ल्याच्या प्रवासात इलेक्ट्रिक व्हेईकलधारकांची चार्जिंग स्टेशनअभावी गैरसोय होऊ नये म्हणून देशभरातील शहरात आणि महामार्गावर रिटेल आऊटलेट असलेल्या एचपीसीएलसोबत करार केला आहे. त्यानुसार टाटा पॉवर सदर पेट्रोल पंपावर चार्जिंग स्टेशन उभारणार आहे. टाटा पॉवर आतापर्यंत शहरातील सार्वजनिक ठिकाणे, मेट्रो स्टेशन सिनेमगृह, शॉपिंग मॉल अशा ठिकाणी चार्जिंग स्टेशन उभारली आहेत. मात्र आता शहराबाहेर आणि महामार्गावरही चार्जिंग स्टेशन होणार असल्याने इलेक्ट्रिक व्हेईकलधारकांना मोठा दिलासा मिळणार आहे. विजेवर चालणाऱया वाहनांसाठी आता आम्ही शहराबरोबरच महामार्गावर चार्जिंग स्टेशन उभारून ग्राहकांना चांगली सेवा देण्याचा प्रयत्न करत असल्याचे टाटा पॉवरच्या ईव्ही चार्जिंगचे प्रमुख संदीप बांगिया यांनी स्पष्ट केले आहे.