
सामना ऑनलाईन । मुंबई
मुंबईकरांना वीजपुरवठा करण्यासाठी बेस्ट उपक्रम टाटा पॉवरकडून वीज विकत घेते. परंतु गेल्या पाच महिन्यांची टाटा पॉवरची विजेची रक्कम बेस्टने अदा केलेली नाही. त्यामुळे थकीत बिल द्या, अन्यथा येत्या 21 मेपासून वीजपुरवठा बंद करू असा गंभीर इशारा टाटा पॉवरने बेस्ट प्रशासनाला दिला आहे. तसे पत्रच बेस्टला पाठविण्यात आलेले आहे. परिणामी ऐन उन्हाळय़ात शहरातील बेस्टच्या वीज ग्राहकांची वीज गुल होण्याची दाट शक्यता निर्माण झालेली आहे.
बेस्ट उपक्रमाला टाटा पॉवरकडून वीज देण्यात येते. शहरात वीजपुरवठा करण्याचा अधिकार बेस्टकडे आहे. त्यामुळे टाटा पॉवरकडून वीज घेऊन ग्राहकांना विजेचा पुरवठा करण्याचे काम बेस्ट करते. त्यासाठी बेस्टला टाटा पॉवरला महिन्याला विजेची रक्कम अदा करावयाची असते. परंतु डिसेंबर 18 आणि जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल आणि मे या पाच महिन्यांची सुमारे 561 कोटी 58 लाख रुपये इतकी रक्कम अदा केलेली नसल्यामुळे टाटा पॉवरने बेस्ट प्रशासनाला पत्र पाठविले आहे.
दर महिन्याला रक्कम अदा करताना होणाऱ्या लेटमार्कमुळे टाटा पॉवरने पत्रात नाराजीदेखील व्यक्त केलेली आहे. तसेच ही थकबाकी लवकरात लवकर अदा केली नाही तर येत्या 21 मेपासून वीजपुरवठा बंद करण्याचा इशारा दिला आहे. तसेच बेस्टला देण्यात येणारी वीज दुसऱ्या कोणत्याही वितरकाला देण्यात येईल असेदेखील स्पष्ट केलेले आहे. त्यामुळे बेस्टच्या संकटात आणखीनच वाढ होण्याची शक्यता आहे.
थकबाकीची आकडेवारी
बिलाचा महिना रक्कम (कोटींमध्ये)
- डिसेंबर 18 112.24
- जानेवारी 19 88.06
- फेब्रुवारी 19 108.47
- मार्च 19 106.09
- एप्रिल 19 135.90
- एकूण 561.58

























































