तौकते चक्रीवादळाचा कोकणात हाहाःकार; झाडे पडली, छप्परे उडाली

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

तौकते चक्रीवादळाने कोकण किनारपट्टीवर दाणादाण उडवली. रविवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास तौकते चक्रीवादळाने जिल्ह्यात प्रवेश केला. 120 ते 130 किमी वेगाने वाहणारे वारे आणि मुसळधार पावसाने हाहाःकार माजवला. अनेक वृक्ष उन्मळून पडले, झाडांच्या फांद्या कोसळल्या, छप्परांवरची कौले उडाली, पत्रे उडाले. तौकते चक्रीवादळाने कोकणवासीयांचे मोठे नुकसान केले आहे.

तौक्त चक्रीवादळाची वर्दी देत शनिवारपासूनच रत्नागिरीत पाऊस सुरू झाला. ढगाळ वातावरणासह पाऊस आणि वादळी वारे सुरू झाले. आज दुपारी एक वाजता चक्रीवादळ राजापूर तालुक्यातील आंबोळगडात घुसले. तिथून पुढे सरकत संध्याकाळी पाच वाजेपर्यंत ते रत्नागिरीत पोहचले.

तौकते चक्रीवादळाचा रत्नागिरीच्या किनारपट्टीला तडाखा बसला. वादळी वाऱ्यांबरोबरच पावसाचा जोर सुरूच होता. अनेक ठिकाणी झाडे कोसळ्याने वाहतूक ठप्प झाली. किनारपट्टीवरील घरांची कौले आणि पत्रे उडून गेले. रात्री आठ वाजेपर्यंत रत्नागिरी तालुक्यात चक्रीवादळाचे तांडव सुरू होते. वादळाच्या काळात विद्युत तारा तुटून दुर्देवी घटना घडू नयेत म्हणून महावितरणने दुपारी 12 वाजल्यापासून वीज पुरवठा बंद ठेवला होता.

चक्रीवादळाचा धोका लक्षात घेऊन रत्नागिरीतील 365 आणि राजापूरातील 289 नागरिकांचे स्थलांतरण करण्यात आले होते.रत्नागिरी जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट देण्यात आला होता. तसेच जिल्ह्यातील राजापूर, रत्नागिरी, गुहागर, दापोली आणि मंडणगड तालुक्यात संचारबंदी लागू करण्यात आली होती.