
सोलापूर महापालिकेच्या कराची थकलेली कोट्यवधींची थकबाकी वसूल करण्यासाठी महापालिकेने करदात्यांसाठी नोव्हेंबर ते मार्चपर्यंत अभय योजना लागू केली आहे. तरीही ऑक्टोबरच्या तुलनेत नोव्हेंबरमध्ये करवसुलीत सुमारे तीन कोटींची वसुली कमी झाली आहे. एप्रिल ते नोव्हेंबर या काळात महापालिकेच्या तिजोरीत 51 कोटी 3 लाख 71 हजार रुपयांचा कर जमा झाला आहे.
सोलापूर महापालिकेच्या तिजोरीत दरवर्षी साडेपाचशे ते सहाशे कोटींचा महसूल जमा व्हावा, असे उद्दिष्ट ठेवले जाते. मात्र, मागील तीन-चार वर्षांत एकदाही महापालिकेला हे उद्दिष्ट गाठता आलेले नाही. त्यामुळे तिजोरीत तब्बल 1100 कोटी रुपयांची तूट आली आहे. कोरोनामुळे यंदा महापालिकेच्या तिजोरीची अवस्था आणखी बिकट झाली आहे.
करवसुली व्हावी, शहरातील प्रलंबित कामे मार्गी लागावीत, म्हणून महापालिकेने ऑनलाइन टॅक्स भरणाऱ्यांना दोन टक्क्यांपर्यंत सवलतीचा निर्णय घेतला. त्यानंतर पाच ते दहा लाख आणि दहा लाखांवरील थकबाकीदारांची यादी तयार करून आयुक्त व उपायुक्तांकडे त्यांची सुनावणी झाली. तत्पूर्वी, त्यांच्यासाठी अभय योजना लागू करून मूळ रकमेवरील दंडाची रक्कम 80 टक्क्यांपर्यंत कमी करण्याचाही निर्णय झाला. तरीही थकबाकीदारांनी कोरोनाचे कारण पुढे करीत कर भरण्याकडे पाठ फिरविल्याचे चित्र आहे.
एप्रिल महिन्यात सोलापूर महापालिकेच्या तिजोरीत अवघे 42 हजार रुपये जमा झाले, तर मे महिन्यात 51 लाख, जूनमध्ये एक कोटी 38 लाख, ऑगस्टमध्ये सव्वासात कोटी, सप्टेंबरमध्ये 11 कोटी 30 लाख, तर ऑक्टोबरमध्ये सर्वाधिक 12 कोटी 22 लाखांचा आणि नोव्हेंबरमध्ये 9 कोटी 88 लाख 57 हजार 925 रुपयांचा करभरणा झाला आहे. अपेक्षित करवसुली होत नसल्याने तीन वर्षांपासून जीएसटी अनुदानातून वेतनासह अन्य खर्च भागविला जात आहे.


























































