इंधन दरवाढीचा जबर फटका, 1 मार्चपासून रिक्षा-टॅक्सीचे भाडे 3 रुपयांनी महागणार

पेट्रोल, डिझेल दरवाढीतून कोणताच दिलासा मिळाला नसल्याने सर्वसामान्यांना आता रिक्षा आणि टॅक्सीच्या भाडेवाढीला सामोरे जावे लागणार आहे. 1 मार्चपासून टॅक्सीच्या भाडय़ामध्ये 2 रुपये 1 पैसे तर रिक्षाच्या भाडय़ात 2 रुपये 9 पैशांनी वाढ होणार आहे. यामुळे टॅक्सीचे किमान भाडे 22 रुपयांवरून 25 रुपये तर रिक्षाचे भाडे 18 वरून 21 रुपये होणार आहे. परिवहनमंत्री अनिल परब यांनी भाववाढीविषयीची माहिती दिली. रिक्षा-टॅक्सी भाडेवाढीबाबत खटुआ समितीने केलेल्या शिफारशींनुसार भाववाढ करण्यात आली असल्याचे ऍड. अनिल परब यांनी सांगितले. 2021 पर्यंत सर्व रिक्षा चालकांनी आपले टेरिफ कार्ड अपडेट करून घ्यावे. 1 मेपर्यंत रिक्षा आणि टॅक्सी चालकांनी टेरिफ कार्ड अपडेट करावे लागणार आहे.

मुंबईसह ठाणे, नवी मुंबईत भाडेवाढ लागू

टॅक्सी-रिक्षाच्या भाडय़ात किमान 3 रुपयांची वाढ झाली आहे. ही नवी भाडेवाढ मुंबईसह, ठाणे, नवी मुंबईमध्ये लागू केली जाणार आहे. या निर्णयाचे अनेक रिक्षा, टॅक्सी चालक, मालक संघटनांनी स्वागत केले आहे.

सहा वर्षांनंतर भाडेवाढ

खटुआ समितीच्या निकषानुसार ही भाडेवाढ झाली आहे. या समितीत संघटनांचा समावेश असतो. त्यामुळे सर्व घटकांचा विचार करून ही भाडेवाढ झाली आहे. सहा वर्षे भाडेवाढ झाली नाही. खूप वर्षांपासून ही भाडेवाढ देय आहे. त्यामुळे ही भाडेवाढ मदत म्हणून दिली आहे. रिक्षा, टॅक्सीचालक हा समाजाचा एक घटक आहे. त्यामुळे सरकारने त्यांना मदतीचा एक हात देणे गरजेचे होते. त्याचप्रमाणे शेअर रिक्षा भाडय़ासंदर्भातही लवकरच निर्णय घेतले जाणार असल्याचे अनिल परब यांनी स्पष्ट केले.

  • टॅक्सीचे भाडे 22 वरून 25 रुपये तर रिक्षाभाडे 18 वरून 21 रुपये
  • रिक्षाचे किमान भाडे 21 रुपये व त्यापुढील प्रतिकिमीला 14.20 रुपये मोजावे लागणार आहेत.
  • टॅक्सीचे किमान भाडे 25 रुपये व त्यापुढील प्रतिकिमीला 16 रुपये मोजावे लागणार आहेत.
आपली प्रतिक्रिया द्या