टीबी नियंत्रण कर्मचाऱ्यांच्या बोनससाठी आयुक्तांच्या घरासमोर दिवाळी साजरी करू!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पालिकेच्या क्षयरोग नियंत्रण उपक्रमात काम करणाऱ्या 450 कर्मचाऱ्यांना बोनस देण्याचे आश्वासन देऊनही दिवाळी सुरू होण्यास फक्त चार दिवस राहिले तरी अंमलबजावणीला पालिका प्रशासन दिरंगाई करीत आहे. त्यामुळे या कर्मचाऱ्यांना 15 हजार रुपये बोनस द्यावा, अन्यथा दिवाळी दिवशी संबंधित सर्व कर्मचारी आयुक्तांच्या निवासस्थानासमोर ठिय्या आंदोलन करत दिवाळी साजरी करतील, असा इशारा म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेनेने दिला आहे.

पालिकेच्या जिल्हा क्षयरोग नियंत्रण संस्थेचे कर्मचारी घरोघरी जाऊन तपासणी करणे, उपचार करणे आदी कामे करतात. मात्र त्यांना पालिकेकडून कोणत्याही सुविधा मिळत नाहीत. त्यामुळे टीबी नियंत्रण कर्मचाऱ्यांनाही या वर्षी पालिकेने बोनस द्यावा, अशी मागणी म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेनेचे अध्यक्ष बाबा कदम, चिटणीस संजय वाघ यांच्या वतीने केली आहे. याबाबत याआधी झालेल्या चर्चेनुसार बोनस देण्याचे आश्वासन दिले होते, मात्र त्याची अंमलबजावणी झालेली नाही. दरम्यान, म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेनेचे शिष्टमंडळ उद्या उपायुक्तांची बोनसबाबत भेट घेणार आहेत.