
सामना प्रतिनिधी । संभाजीनगर
विकासकामात गेलेल्या रोडवरील जमिनीचा मोबदला घेतलेला असतानासुद्धा नगरसेवकपदाचा दुरुपयोग करून प्रस्ताव दाखल करून २७ लाखांचा टीडीआर घोटाळा करणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसचा माजी नगरसेवक सिकंदर साजेद बिल्डर यास आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली. टीडीआर घोटाळ्याच्या तीन गुन्ह्यांत तो गेल्या दोन वर्षांपासून फरार होता.
मनपाच्या वतीने शहरातील महत्त्वाच्या रस्त्याचे रुंदीकरण करण्यात आले होते. यामध्ये सराफा रोड भागात रस्ता रुंदी करणाच्या वेळी संपादित जागेचा टीडीआर स्वरूपात २०१४ मध्येच मोबदला घेण्यात आला होता. मोबदला घेतल्यानंतरसुद्धा राष्ट्रवादीचा नगरसेवक अब्दुल सिकंदर याने अधिकाराचा दुरुपयोग करत २००८ मध्ये पुन्हा त्याच रस्ते बाधित क्षेत्राचा टीडीआर मोबदला मिळावा म्हणून सभेमध्ये प्रस्ताव दाखल करून राजकीय वजन वापरत टीडीआर प्रमाणपत्र घेतले. हे प्रमाणपत्र हे आदित्य कन्स्ट्क्शनला १८ लाख ९० हजार रुपयांना विक्री केले. ही बाब उघड होताच शाखा अभियंता प्रभाकर पाठक यांनी ३० नोव्हेंबर २०१६ रोजी सिटीचौक पोलीस ठाण्यात मनपाची फसवणूक केल्याची तक्रार दाखल केली. यावरून अब्दुल सिकंदरविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. तर दुसऱ्या घटनेत चेलीपुरा रस्ते विकास योजना बाधीत क्षेत्राचा ८ लाख २५ हजार रुपयांचा मोबदला १९९७ मध्ये घेतलेला असताना अब्दुल सिंकदर याने त्याच जागेचा टीडीआर स्वरूपात मोबादला मिळावा म्हणून २०१६ मध्ये महापालिकेत प्रस्ताव दाखल केला. या प्रकरणातही सिकंदर बिल्डरविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर त्याने मंजुरपुरा येथील रस्ते शहर विकास आराखड्यानुसार बाधित क्षेत्राचा मोबदला मनपाकडून १९९७ मध्ये घेतला होता.
पुन्हा त्याच जागेचे टीडीआर स्वरुपात प्रमाणपत्र मिळावे म्हणून अब्दुल सिंकदर याने २०१६ मध्ये खोटा व बनावट प्रस्ताव तयार करून मनपाची दिशाभूल केली. मनपाला लाखोंचा गंडा घालणाऱ्या सिकंदर बिल्डरविरुद्ध सिटीचौक पोलीस ठाण्यात एकूण तीन फसवणुकीचे गुन्हे दाखल करण्यात आले होते. या तिन्ही गुन्ह्यांचा तपास पोलीस आयुक्तांनी आर्थिक गुन्हे शाखेकडे दिला होता. आर्थिक गुन्हे शाखेने केलेल्या प्राथमिक चौकशीत भक्कम पुरावे असल्याने तब्बल दोन वर्षानंतर माजी नगरसेवक अब्दुल सिकंदर साजेद याला आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्रीकांत नवले, सहायक पोलीस उपनिरीक्षक सुभाष खंडागळे, पोकॉ महेश उगले, सचिन संपाळ, संजय जारवाल, नितीन घोडगे, मनोज उईके याच्या पथकाने अटक केली.






























































