चहा आणि कॉफी प्यायला आवडते? मग ही बातमी तुमच्यासाठी, वाचा सविस्तर

चहा किंवा कॉफी ही जगभरात तरतरी आणण्यासाठी घेतली जाणारी उत्तेजक पेयं आहेत. हिंदुस्थानात तर चहा आणि कॉफी या दोन्ही पेयांना अत्यंत आवडीने प्यायलं जातं. देशातल्या अनेक राज्यांमध्ये यातील एका पेयाने अनेकांच्या दिवसाची सुरुवात होते. काहींना दिवसभरात कधीही तल्लफ आली की चहा किंवा कॉफी प्यायची सवय असते. पण, ही पेयं अतिप्रमाणात घेतल्यास घातक ठरतात, असा इशारा इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल रिसर्चने दिला आहे.

आयसीएमआरने या संदर्भात काही मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. त्यानुसार, दिवसभरात कधीही कुठल्याही अन्नाच्या सेवनानंतर चहा किंवा कॉफी टाळावी. कारण, त्याने शरीरात लोह शोषून घेण्याच्या प्रक्रियेत बाधा येते. चहा आणि कॉफीमध्ये असलेला टॅनिन हा पदार्थ शरीरात लोह शोषून घेण्याच्या प्रक्रियेत अडथळे निर्माण करतो. त्यामुळे अनेकांना रक्तक्षय (अॅनिमिया) होऊ शकतो, असा इशारा आयसीएमआरने दिला आहे.

कोणतंही अन्न सेवन करण्याच्या एक तास आधी आणि नंतर चहा किंवा कॉफी सेवन करू नये. तसंच, या दोघांमध्ये असलेले कॅफिन आणि टॅनिन हे पदार्थ मज्जासंस्थेवर प्रभाव टाकतात हे खरं असलं तरी त्यांच्या अतिसेवनाने रक्तदाब वाढणे, हृदयाचे ठोके अनियमित होणे तसंच बॅड कोलेस्टेरॉल वाढणे अशांसारखे त्रास उद्भवू शकतात, असाही इशारा देण्यात आला आहे.