
कसोटी क्रिकेटमध्ये नेहमीप्रमाणे आधी लंच ब्रेक आणि नंतर टी टाईम घेतला जातो, पण गुवाहाटी कसोटीत सूर्यास्त लवकर होत असल्याने बीसीसीआय वेळ वाचवण्यासाठी या क्रमात बदल करण्याच्या तयारीत आहे.
हिंदुस्थान आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात 22 नोव्हेंबरपासून सुरू होणारा दुसरा कसोटी सामना गुवाहाटीच्या बरसापारा मैदानावर होणार आहे. हिवाळय़ात ईशान्य भागात सूर्य लवकर मावळत असल्याने या कसोटीसाठी विशेष वेळापत्रक आखले जात आहे.
सामना सकाळी 9 वाजता सुरू होऊन संध्याकाळी 4 वाजता संपणार आहे. पहिला ब्रेक सकाळी 11 ते 11.20 या वेळेत ‘चहापानासाठी’ असेल, तर लंच ब्रेक दुपारी 1.20 ते 2 या वेळेत ठेवण्याची योजना आहे. त्यानंतरचे सत्र दुपारी 2 ते संध्याकाळी 4 पर्यंत चालेल. गुवाहाटीत साधारण 4.15 वाजताच सूर्यास्त होतो. त्यामुळे दिवसाच्या उजेडाचा पूर्ण उपयोग व्हावा यासाठी हा ‘आधी टी टाईम, नंतर लंच’ असा अनोखा प्रयोग करण्यात येऊ शकतो, अशी माहिती विश्वसनीय सूत्रांकडून समोर आली आहे. आसाम क्रिकेट संघटनेने मात्र स्पष्ट केले की, आम्हाला बीसीसीआयकडून अजून कोणतीही अधिपृत सूचना मिळालेली नाही. रणजी सामन्यांमध्ये आमचा पहिला ब्रेक सकाळी 11.15 वाजता लंचसाठी असतो.
 
             
		




































 
     
    




















