
कोरोनाची दुसरी लाट कमी झाल्यानंतर देशातील बहुतांश राज्यात शाळा, महाविद्यालये सुरू झाली आहेत. विद्यार्थी आपल्या शाळकरी मित्रांना, शिक्षकांना भेटण्यासाठी आणि शिक्षकही आपल्या विद्यार्थ्यांना भेटण्यासाठी उस्तुक असल्याचे पाहायला मिळाले. मात्र पश्चिम बंगालमधील हुगली जिल्ह्यात एक धक्कादायक घटना उघडकीस आली असून येथे शिक्षकाने विद्यार्थ्यांला जोरात कानफटावल्याने त्याच्यावर शस्त्रक्रियेची वेळ आली आहे.
हुगली जिल्ह्यातील उत्तरपाडा येथील अमरेंद्र विद्यालय कोरोनानंतर पहिल्यांदाच उघडण्यात आले. वर्ग सुरू झाल्याने विद्यार्थी आनंदाने शाळेत पोहोचली. तब्बल 20 महिन्यांनी शाळेचे वातावरण अनुभवायला मिळाल्याने सुभोजित मन्ना नावाच्या विद्यार्थ्याने मधल्या सुट्टीत जेवणाचा डब्बा वाजवून आपला आनंद व्यक्त केला. मात्र त्याचे हे कृत्य शाळेतील गौतम रूईदास या शिक्षकाला आवडले नाही आणि त्याने या मुलाच्या जोरात कानाखाली वाजवले.
पीडित विद्यार्थ्याने शिक्षकांची तक्रार मुख्याध्यापकांकडे केली. ही तक्रार केल्यानंतर शिक्षकाने पुन्हा या विद्यार्थ्याच्या कानाखाली मारली. शिक्षकाने जोरात मारल्याने विद्यार्थ्यांच्या कानाखाली दुखू लागले. घरी गेल्यावर मुलाने आपल्या आई-वडिलांना शाळेत घडलेला किस्सा सांगितला. त्यानंतर त्याच्या पालकांनी त्याला घेऊन रुग्णालयात धाव घेतली.
डॉक्टरांनी प्राथमिक उपचार केल्यानंतर पुढील 6 ते 8 आठवडे ऑब्जर्वेशनमध्ये राहण्याचा सल्ला दिला आहे. यानंतरही सर्व काही ठीक झाले नाही तर शस्त्रक्रिया करावी लागेल असेही डॉक्टरांनी सांगितल्याचे मुलाच्या पालकांनी सांगितले. यानंतर पीडित मुलाच्या पालकांनी पोलीस स्थानकामध्ये संबंधित शिक्षकाविरोधात तक्रार दाखल केली आहे.
दरम्यान, या प्रकरणावर बोलताना शिक्षक गौतम रुईदास म्हणाले की, विद्यार्थ्यांला मारहाण करण्याचा माझा कोणताही इरादा नव्हता आणि त्याच्यासोबत शत्रूत्वही नाही. आपण फक्त विद्यार्थ्याला शिस्तीचे पालन करण्यास सांगितले, मात्र नकार दिल्याने त्याच्या कानाखाली मारली. त सेच मुख्याध्यापकांकडे तक्रार केल्यानंतर विद्यार्थ्याने आपल्याला धमकी दिल्यामुळे पुन्हा त्याच्या कानाखाली मारली, असेही शिक्षकाने सांगितले.


























































