विद्यार्थिनींशी गैरवर्तन केल्याप्रकरणी प्राथमिक शाळेतील शिक्षक बडतर्फ

866

अल्पवयीन विद्यार्थिनीशी गैरवर्तन आणि जिल्हा परिषद प्रशासनाविरोधात वारंवार उपोषणाचे हत्यार उगारल्याचा ठपका ठेवत खेड तालुक्यातील सुकदर जिल्हा परिषद प्रार्थमिक शाळेत कार्यरत असलेले शिक्षक सुशिलकुमार पावरा यांना सेवेतून बडतर्फ करण्यात आले आहे. विभागीय चौकशीत पावरा यांच्यावरील आरोप सिद्ध झाल्याने ही कारवाई करण्यात आली.

खेड तालुक्यातील सुकदर येथील प्राथमिक शाळेत कार्यरत असताना विद्यार्थिनीशी अश्लील वर्तन केल्य़ाप्रकरणी पावरा यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली होती. याप्रकरणी गटशिक्षणाधिकाऱ्यांनी सखोल चौकशी करून जिल्हा परिषदेला अहवाल सादर केला होता. पावरा यांनी बचावासाठी केलेले निवेदन, पुरावे व दाखल दस्तऐवजावरून त्यांच्यावर ठेवलेले दोषारोप सिद्ध झाले आहेत. त्याचबरोबर जिल्हा परिषद प्रशासनाविरोधात वारंवार उपोषण पुकारून त्यांनी प्रशासनाला वेठीस देण्याचा प्रयत्न केल्याचाही ठपका त्यांच्यावर आहे. प्रशासनाकडे सादर केलेले कागदपत्र गहाळ झाल्याचा आक्षेप घेत पावरा यांनी अनेकदा उपोषण केले. जिल्हा परिषद, पंचायत समितीस्तरावर अनेकदा उपोषणे करून ते चर्चेत राहिले होते.

यापुर्वी दोन वेळा त्यांची विभागीय चौकशी लावण्यात आली होती. विद्यार्थिनीशी अश्लील वर्तन व उपोषणाद्वारे प्रशासनाला देत असलेल्या त्रासाबाबत झालेल्या विभागीय चौकशीत पावरा यांना दोषी ठरवण्यात आले. त्याबाबतची नोटीसही त्यांना देण्यात आली, मात्र त्यांच्या वर्तनात कोणतीही सुधारणा झालेली नव्हती. शिक्षण विभागाकडून यापूर्वी पावरा यांना दोन वेळा निलंबित करण्यत आले होते. आता त्यांच्यावरील दोषारोप दुसऱ्यांदा सिद्ध झाल्याने जि.प.प्रशासनाने त्यांना बडतर्फ करण्याचा निर्णय घेतला. 13 ऑगस्ट रोजी पावरा यांच्या बडतर्फीचे आदेश मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या स्वाक्षरीने खेडच्या गटशिक्षणाधिकाऱ्यांच्या मार्फत शाळेच्या मुख्याध्यापकांना पाठवण्यात आले.

आपली प्रतिक्रिया द्या