ऑनलाइन बदल्यांचा शिक्षकांना फटका, ६५५ विस्थापित, चुकीच्या ठिकाणी बदल्या

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
प्रातिनिधिक फोटो

सामना प्रतिनिधी । पुणे

पुणे जिल्हा परिषदेच्या कार्यक्षेत्रातील कार्यरत मुख्याध्यापक, पदवीधर शिक्षक, उपशिक्षकांची बदली प्रक्रिया यावर्षी पहिल्यांदाच ऑनलाइन पद्धतीने राबविण्यात आली आहे. मात्र, ही प्रक्रिया राबविताना त्यात अनेक त्रुटी राहिल्याने त्याचा फटका जिल्ह्यातील शेकडो शिक्षकांना बसला आहे. यंदा तब्बल ६ हजार ४३ शिक्षकांच्या बदल्या झाल्या असल्या, तरी यात ६५५ शिक्षक विस्थापित (शाळेविना) झाले आहेत. विस्थापित शिक्षकांसह पती-पत्नी एकत्रीकरण, पसंतीच्या विरोधात मिळालेल्या शाळा अशा अनेक त्रुटी ऑनलाइन बदली प्रक्रियेत आढळून आल्या आहेत. या संदर्भात राज्याच्या ग्रामविकास खात्याचे सचिव असीम गुप्ता यांच्याकडे जिल्हा परिषद दाद मागणार आहे.

सन २०१७-१८ या वर्षासाठी जिल्हा परिषदेअंतर्गत कार्यरत मुख्याध्यापक, पदवीधर शिक्षक, उपशिक्षकांच्या सर्वसाधारण बदल्या ऑनलाइन पद्धतीने करण्यात आल्या. ऑनलाइन बदल्यांचा आदेश हा ऑनलाइन पद्धतीने पंचायत समिती स्तरावरून शिक्षकांन प्राप्त करून देण्यात आला आहे. त्यानंतर शिक्षकांनी बदल्यांबाबत विविध तक्रारी केल्या आहेत. त्या तक्रारींचे निराकरण करण्यासाठी जिल्हा परिषदेत गुरुवारी बैठक घेण्यात आली. त्यावेळी जिल्ह्यातील चारशेहून अधिक शिक्षक उपस्थित होते. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी सूरज मांढरे, प्राथमिक शिक्षणाधिकारी गणपत मोरे आदी अधिकारी उपस्थित होते. या बैठकीत शिक्षकांच्या सर्व तक्रारी जाणून घेण्यात आल्याची माहिती जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष तथा शिक्षण समितीचे सभापती विवेक वळसे -पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.

पुणे जिल्ह्यात यावर्षी एकूण ६ हजार ४३ शिक्षकांची बदली प्रक्रिया राबविण्यात आली. त्यामध्ये ५ हजार ३८८ शिक्षकांच्या प्रत्यक्षात बदल्या करण्यात आल्या आहेत. राज्य सरकारच्या आदेशानुसार समुपदेशन आणि ऑनलाइन पद्धतीने बदल्या केल्या आहेत. त्या प्रक्रियेत काही त्रुटी आढळल्या आहेत. त्याचा फटका शिक्षकांना बसल्याने त्यांनी तक्रारी केल्या आहेत. बदली झालेल्यांपैकी सुमारे ६५५ शिक्षक विस्थापित झाले आहेत. म्हणजेच त्यांना शाळाच मिळाल्या नाहीत. विस्थापितांमध्ये ५१ पदवीधर शिक्षकांसह ६०२ उपशिक्षकांचा समावेश आहे. त्याशिवाय महिलांसाठी अवघड क्षेत्राच्या ठिकाणी बदली मिळू नये, असे असताना संगणकावर अवघड ठिकाणी बदली करण्यात आल्या आहेत. तसेच, ऑनलाइन प्रक्रियेसाठी भरावयाच्या अर्जामध्ये २० ठिकाणचे पसंतीक्रम द्यायचे होते. अर्ज भरतानाही अनेकांच्या चुका झाल्या आहेत. या संदर्भात शिक्षकांनी तक्रारी केल्या असून, त्याची दखल घेऊन ग्रामविकास खात्याचे सचिव असीम गुप्ता यांची लवकरच भेट घेणार आहोत. अन्याय झालेल्या शिक्षकांसाठी त्यांच्याकडे दाद मागितली जाणार आहे, असेही वळसे- पाटील यांनी सांगितले.

शिक्षकांनी पसंतीक्रम देऊनही त्यांच्या पसंतीच्या शाळा अथवा गावांमध्ये त्यांच्या बदल्या झाल्या नाहीत. पती-पत्नीच्या एकत्रीकरणाच्या नियमांचे पालन झालेले दिसत नाही. काही शाळांवर मंजूर पदांपेक्षा किंवा रिक्त पदांपेक्षा जास्त शिक्षक बदलीने रुजू झाल्यास त्यांच्या वेतनाचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, असे वळसे-पाटील यांनी स्पष्ट केले.