शिक्षकांचे जि.प. समोर ‘उपोषण’ तर जिल्हा कचेरीपुढे ‘भिक मांगो’ आंदोलन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । हिंगोली

जिल्हा परिषदेच्या कार्यालयासमोर विषय शिक्षकांना पदोन्नती देण्यात यावी यासह अन्य मागण्यांसाठी शिक्षकांनी बुधवारी उपोषण केले. तर विना अनुदानीत विद्यालयामधील शिक्षकांनी भिक मांगो आंदोलन केले. शिक्षक दिनी झालेल्या या आंदोलनामुळे शिक्षकांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

जिल्हा परिषदेच्या कार्यालयासमोर विषय शिक्षकांना पदोन्नती देण्यात यावी, बिंदु नामावलीनुसार उच्चश्रेणी मुख्याध्यापकांच्या जागा भराव्यात, विस्तार अधिकाऱ्यांची पदे तातडीने भरावीत, नोव्हेंबर २००५ नंतर रुजु झालेल्या सर्व शिक्षकांची अंशदान निवृत्ती वेतन योजनेंतर्गत कपात केलेली रक्कम जीपीएफ खात्यामध्ये जमा करावी, या मागणीसाठी शिक्षकांनी उपोषण केले.

शिक्षणाधिकारी संदीप सोनटक्के यांनी या उपोषणाच्या ठिकाणी भेट देऊन शिक्षकांसोबत चर्चा केली. या आंदोलनात रमेश कोंके, किरण राठोड, दत्ता कदम, कैलास पानखाडे, संतोष दराडे, रमेश जाधव, हरी मुटकुळे यांच्यासह शिक्षक व शिक्षीकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. तर विना अनुदानीत उच्च माध्यमिक व कनिष्ठ माध्यमिक विद्यालयामधील शिक्षकांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भिक मांगो आंदोलन केले. विना अनुदानीत महाविद्यालयामधील शंभर टक्के अनुदानाची आर्थिक तरतुद शासनाने केली नसल्याच्या निषेधार्थ हे आंदोलन करण्यात आले. पावसाळी अधिवेशनादरम्यान मंत्र्यासमवेत चर्चा होऊनही तसेच मागील ४ वर्षापासुन शासन विना अनुदानीत उच्च माध्यमिक व कनिष्ठ माध्यमिक महाविद्यालयांच्या शिक्षकांच्या मागण्याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप करण्यात आला. तसेच जिल्हाधिकाऱ्यांना मागण्यांचे निवेदनही देण्यात आले. या निवेदनावर मानकेश्वर गलंडे, विठ्ठल अंभोरे, जी.जे. वाबळे, सुनील जगताप आदींसह शिक्षकांच्या स्वाक्षऱ्या आहेत.