जनगणनेसाठी शिक्षकांची मे महिन्याची सुट्टी रद्द करणार

2362

देशाच्या जनगणनेसाठी मोठय़ा प्रमाणात शिक्षकांच्या नेमणुका करण्यात येणार असून त्यासाठी त्यांच्या मे महिन्यातील सुट्टय़ाही रद्द केल्या जाणार आहेत. जनगणना अधिकाऱयांनी शिक्षणाधिकाऱयांना तशा नोटिसा पाठवल्या आहेत. त्यामुळे राज्यातील लाखो शिक्षकांमध्ये आक्रोश निर्माण झाला असून महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेने या निर्णयाचा निषेध करत शिक्षकांच्याच माथी हे काम मारू नये अशी मागणी केली आहे.

2021 च्या जनगणनेचे काम सुरू झाले आहे. पहिल्या टप्प्यामध्ये घरांना क्रमांक देणे, गटाची विभागणी करणे, घरयादी तयार करणे आदी कामे 1 मे ते 15 जून 2020 या कालावधीत केली जाणार आहेत. त्यासाठी या कालावधीतील शिक्षकांच्या सुट्टय़ा रद्द करण्यात येणार आहेत. त्यामुळे वर्षाच्या 76 पैकी 39 सुट्टय़ांवर गदा येणार आहे. या कालावधीत महापालिका आणि खासगी शाळांतील शिक्षक आणि मुख्याध्यापकांना मुख्यालय सोडू देऊ नये अशा सूचना जनगणना अधिकाऱयांनी दिल्या आहेत. मुख्यालय सोडण्यास परवानगी दिल्यास त्यासाठी मुख्याध्यापकांना जबाबदार धरून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असाही इशारा देण्यात आला आहे.

प्रत्येक कामासाठी शिक्षकच का?

प्रत्येक कामासाठी शिक्षकच का वापरले जातात? त्यांच्याच सुट्टय़ांवर गदा का आणली जाते? इतर कर्मचाऱयांकडे हे काम का सोपवले जात नाही? आम्ही जनगणना अधिकाऱयांची भेट घेऊन शिक्षकांच्या सुट्टय़ा रद्द करू नयेत. कारण त्या कालावधीत त्यांना पुटुंबासोबत बाहेर जावे लागते तसेच बोर्डाचे पेपर तपासणीचेही काम येते. – शिवनाथ दराडे, महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद, मुंबईचे कार्यवाह

आपली प्रतिक्रिया द्या