
शालार्थ ओळखपत्र घोटाळ्याच्या गदारोळात राज्यातील शेकडो शिक्षकांचे वेतन थांबले. त्यामुळे उपासमार सोसत असलेल्या शिक्षकांनी विधिमंडळ हिवाळी अधिवेशन काळात सोमवारपासून यशवंत स्टेडियमवर अन्नत्याग आंदोलन पुकारले आहे. या आंदोलनात सहभागी झालेल्या शिक्षिकेची प्रकृती खालावल्याने यशवंत स्टेडियमवर एकच गदारोळ झाला.
राज्य सरकारने गेल्या 10 महिन्यांपासून शालार्थमधून नोकरी मिळालेल्या शिक्षकांचे वेतन अडवून ठेवले आहे. शिक्षकांच्या वेतनाचा प्रश्न निकाली काढावा, असे आदेश मुंबई उच्च न्यायालयानेही दिले आहेत. मात्र तरीही राज्य सरकार वेतन अदा करत नाही. त्यामुळे राज्यातील शिक्षकांनी शालार्थ शिक्षक संघर्ष समितीच्या नेतृत्वाखाली हे अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे. गेल्या सोमवारपासून अन्नत्याग करत आंदोलनाला बसलेल्या 4 महिला शिक्षकांची प्रकृती खालावली.
























































