IndVsWi – हिंदुस्थानच्या विजयात रोहित, रवी चमकले, विंडीजवर 6 गडी राखून सहज विजय

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हिंदुस्थानने पहिल्या टी-20 क्रिकेट सामन्यात पाहुण्या वेस्ट इंडीजचा 6 गडी आणि 7 चेंडू राखून धुव्वा उडविला. पदार्पणवीर फिरकीपटू रवी बिश्नोई व कर्णधार रोहित शर्मा हे हिंदुस्थानच्या विजयाचे शिल्पकार ठरले. रवीने एकाच षटकात दोन फलंदाज बाद करून विंडीजच्या धावगतीला चाप लावला, तर रोहितने हिंदुस्थानला धडाकेबाज सुरुवात करून दिली. व्यंकटेश अय्यरने षटकार ठोकूनच सामना संपविला. या विजयासह हिंदुस्थानने तीन सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली.

विंडीजकडून मिळालेले 158 धावांचे लक्ष्य हिंदुस्थानने 18.5 षटकांत 4 बाद 162 धावा करून पूर्ण केले. कर्णधार रोहित शर्मा (40) व व ईशान किशन (35) यांनी 7.3 षटकांत 64 धावांची सलामी देत हिंदुस्थानला खणखणीत सुरुवात करून दिली. रोहितने 19 चेंडूंत 4 सणसणीत चौकार व 3 टोलेजंग षटकारांसह वादळी 40 धावांची खेळी केली. ईशानने 42 चेंडूंत 35 धावा करताना 4 चेंडू सीमापार पाठविले.

त्याआधी, नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करताना वेस्ट इंडीजने 7 बाद 157 अशी समाधानकारक धावसंख्या उभारली. त्यांच्याकडून निकोलस पुरनने सर्वाधिक 61 धावांची खेळी केली.

सूर्या-व्यंकटेश जोडीचे विजयावर शिक्कामोर्तब

हिंदुस्थानची सलामीची जोडी तंबून परतल्यानंतर विराट कोहली (17) व रिषभ पंत (8) हे लवकर बाद झाले. मात्र, त्यानंतर सूर्यकुमार यादव (नाबाद 34) व व्यंकटेश अय्यर (नाबाद 24) यांनी पाचव्या गडय़ासाठी 48 धावांची अभेद्य भागीदारी करीत हिंदुस्थानच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. सूर्यकुमारने 18 चेंडूंत 5 चौकारांसह एक षटकार लगावला, तर व्यंकटेशने 13 चेंडूंत 2 चौकार व एक षटकार ठोकला. विंडीजकडून रोस्टन चेसने 2, तर शेल्डॉन कॉट्टरेल व फॅबियन एलेन यांनी 1-1 गडी बाद केला.