‘टीम इंडिया’ मालिका विजयाच्या धुळवडीसाठी आतूर, जगज्जेता इंग्लंडही मालिका जिंकण्यासाठी सज्ज

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

होळीच्या मुहूर्तावर निर्णायक तिसऱया एकदिवसीय क्रिकेट सामन्यात इंग्लंडला धुळ चारून एक दिवस आधीच मालिका विजयाची धुळवड खेळण्यासाठी ‘टीम इंडिया’ आतूर झाली आहे. मात्र दुसऱया लढतीत आव्हानात्मक धावसंख्येचा सहज यशस्वी पाठलाग करून मालिकेत 1-1 अशी बरोबरी केल्याने मनोबल उंचावलेला जगज्जेता इंग्लंडचा संघही मालिका जिंकण्याचे स्वप्न बघू लागलाय. त्यामुळे उभय संघांमधील उद्याचा (दि. 28) निर्णायक सामना म्हणजे क्रिकेटप्रेमींसाठी पर्वणीच ठरणार आहे एवढे नक्की.

बदलाची शक्यता

मागील लढतीत इंग्लंडने 20 षटकारांची आतषबाजी करून 337 धावांचे कठीण आव्हानही खुजे ठरविले. कुलदीप यादव व कृणाल पांडय़ा या फिरकीपटूंच्या गोलंदाजीवर इंग्लंडच्या फलंदाजांनी धावांची लयलूट केली. जॉनी बेयरस्टो व बेन स्टोक्स यांनी जबरदस्त फलंदाजी केली. कर्णधार विराट कोहलीला यावेळी नक्कीच रवींद्र जाडेजाची आठवण झाली असेल.

त्यामुळे रविवारच्या लढतीत कुलदीप व कृणाल यांच्याऐवजी युजवेंद्र चहल व वॉशिंग्टन सुंदर या फिरकीपटूंना संघात स्थान दिल्यास नवल वाटायला नको.