
और थोडा… और थोडा… बांगलादेश, श्रीलंका आणि त्यानंतर न्यूझीलंडला धूळ चारून मैदान गाजवणारी टीम इंडिया आता आणखी जोरदार कामगिरी करण्यासाठी जोर लगाके हईशा म्हणत सरावाला जुंपलीय. येत्या 9 फेब्रुवारीपासून ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पांढऱया कपडय़ांमधील कसोटी युद्धासाठी सज्ज होण्यासाठी टीम इंडियाच्या शिलेदारांनी मैदानावर घामदार सराव केला.
पुढील महिनाभर हिंदुस्थानशी चार हात करण्यासाठी ऑस्ट्रेलियन संघ गुरुवारीच हिंदुस्थानात दाखल झाला आहे. ऑस्ट्रेलिया आणि हिंदुस्थान यांच्यातील बॉर्डर-गावसकर ट्रॉफीमधील पहिला कसोटी सामना 9 फेब्रुवारी रोजी नागपूर येथे खेळवला जाणार आहे. त्यामुळे टीम इंडिया या मालिकेसाठी मैदानावर कसून सराव करताना दिसली. नुकताच लग्नबंधनात अडकलेला के. एल. राहुल लग्नाची धामधूम बाजूला ठेवून संघात परतला आहे. तसेच आध्यात्मिक दौऱयावर असलेला विराट कोहलीदेखील मैदानाबरोबर जिममध्ये स्वतःला फिट करण्यासाठी मेहनत घेतोय. दुसरीकडे ऑस्ट्रेलियन संघाने बंगळुरू येथे मुक्काम ठोकला असून, ते हिंदुस्थानी वातावरणाशी जुळवून घेण्याचा प्रयत्न करताहेत. कांगारूंचा हा सराव फेब्रुवारीपर्यंत सुरू राहणार असून त्यानंतर ते नागपुरात दाखल होतील.
कसोटी क्रमवारीसाठी चुरस
हिंदुस्थानने 2020-21 मध्ये ऑस्ट्रेलियाचा 2-1 असा पराभव करत बॉर्डर–गावसकर ट्रॉफी पटकावली होती. याचबरोबर कसोटी अजिंक्यपदाच्या अंतिम सामन्यात पात्र होण्यासाठीसुद्धा ही मालिका उभय संघांना महत्त्वाची ठरणार आहे. सध्या आयसीसीच्या कसोटी रँकिंगमध्ये ऑस्ट्रेलिया अव्वल स्थानावर असून हिंदुस्थान दुसऱया स्थानावर आहे.
अश्विनचा डुप्लिकेट
ऑस्ट्रेलियाने हिंदुस्थानी फिरकीवीरांचा अभ्यास करण्यासाठी अश्विनच्या शैलीचा डुप्लिकेट असलेल्या महिश पिथियाला नेट बॉलर म्हणून बोलावले आहे. कांगारूंना अश्विनची बॉलिंग खेळणे सुलभ व्हावे यासाठीच त्याची मदत घेतला जात आहे.
बॉर्डर–गावसकर
ट्रॉफी कार्यक्रम
पहिली कसोटी 9 ते 13 फेब्रुवारी (नागपूर) दुसरी कसोटी 17 ते 21 फेब्रुवारी (दिल्ली) तिसरी कसोटी 1 ते 5 मार्च (धरमशाला) चौथी कसोटी 9 ते 13 मार्च (अहमदाबाद)































































