नरेंद्र मोदींविरोधात उभ्या राहिलेल्या तेजबहादूर यादव यांची उमेदवारी रद्द होणार ?

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन, वाराणसी

वाराणसी लोकसभा मतदारसंघातून पूर्वी अपक्ष म्हणून आणि नंतर समाजवादी पक्षाने तिकीट दिल्याने त्यांच्याकडून लोकसभा निवडणूक लढवणारे तेजबहादूर यादव यांची उमेदवारी रद्द होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. बीएसएफ जवानांचे हाल उजेडात आणणाऱ्या या निलंबित सैनिकाने 2 प्रतिज्ञापत्र सादर केली आहे. या प्रतिज्ञापत्रांमध्ये वेगवेगळी माहिती असल्याने त्यांच्या उमेदवारीवर आक्षेप घेण्यात आला आहे. जर या प्रतिज्ञापत्रांमधील माहिती निवडणूक आयोगाला खरोखर वेगवेगळी आढळली तर यादव यांची उमेदवारी रद्द होऊ शकते.

निवडणूक अधिकाऱ्यांनी या प्रकरणी आज सकाळी 11 वाजता सुनावणी ठेवली आहे. यादव यांनी दोन प्रतिज्ञापत्रांमध्ये त्यांच्या निलंबनाची दोन वेगळी कारणे दिली आहेत. 24 एप्रिल रोजी अपक्ष म्हणून अर्ज दाखल करत असताना यादव यांनी भ्रष्टाराचाच्या आरोपांमुळे आपल्याला सैन्यातून निलंबित केल्याचं म्हटलं होतं. समाजवादी पक्षाकडून उमेदवारी मिळाल्यानंतर यादव यांनी 29 एप्रिल रोजी नव्याने प्रतिज्ञापत्र सादर केलं होतं. दुसऱ्या प्रतिज्ञापत्रात त्यांनी निलंबनाबाबतची माहिती लवपल्याचा आरोप केला जात आहे. याच मुद्दावरून आक्षेप घेतल्याने तेजबहादूर यादव यांना या प्रकरणी उत्तर देण्याचे आदेश देण्यात आले आहेत. जर निवडणूक अधिकारी उत्तरामुळे संतुष्ट झाले नाही तर यादव यांची उमेदवारी रद्द केली जाऊ शकते.आजतक या वृत्तवाहिनीच्या संकेतस्थळावर याबाबतचे वृत्त प्रसिद्ध करण्यात आले आहे.